क्राईमगडचिरोलीविदर्भ

अवैध दारूसह ५.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त ; दोन आरोपी ताब्यात 

अहेरी पोलिसांची कारवाई 

गडचिरोली : अहेरी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत अवैध दारू व वाहनासह सुमारे ५.९८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अहेरी तालुक्यातील भुजंगरावपेठा गावाजवळील भागात ही कारवाई करण्यात आली.

२६ एप्रिल रोजी अहेरी पोलिसांना अवैध दारू तस्करी होणार असल्याची टीप मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे येथील पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी आपल्या चमुसोबत महागाव ते अहेरी रस्त्यावर नाकाबंदी करत रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान वाहनांची तपासणी सुरू केली. मध्यरात्रीपर्यंत बरेच वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र, काहीच सापडेना. अखेर मध्यरात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान निळ्या रंगाची अशोका लेलंड कंपनीची चारचाकी मालवाहतूक (क्रमांक एम एच- ३४ एबी-६०७०) अहेरीकडे येताना दिसली. भुजंगरावपेठा जवळ सदर चारचाकी वाहनाची तपासणी केली असता फ्लोअर पॅनल वर रिकामी गोण्या आढळून आल्या. मात्र, मध्यरात्री रिकाम्या गोण्या घेऊन चंद्रपूर पासिंगची गाडी अहेरीकडे येत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी कसून त्या वाहनाची तपासणी केली असता फ्लोअर पॅनलच्या खाल्ली कोणालाही लक्षात येणार नाही असे कप्पे तयार करून देशी विदेशी दारू तस्करी करीत असल्याचे आढळले.

सदर वाहनातून अहेरी पोलिसांनी २ लाख ७८ हजार ४०० रुपयांची देशी विदेशी दारू जप्त केली. आरोपींकडून २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि ३ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन असे एकूण ५ लाख ९८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी अनवर खान अबुलहसन खान (४०) रा. मौलाना आझाद वॉर्ड बल्लारपूर, सिद्धार्थ भास्कर रंगारी चालक (३५) रा.ता. रवींद्रनगर बल्लारपूर जि.चंद्रपूर असे दोघांना अहेरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर आरोपींविरुद्ध ६५ (अ), ८३ महादाका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक सत्यासाई कार्तिक, उप विभागीय पोलीस अधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button