
गोंदिया : ८ मे हा जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यात ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ या जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. थॅलेसेमिया हा रक्ताचा आनुवंशिक आजार असून, तो आई-वडिलांकडून मुलांमध्ये संक्रमित होतो. या आजारात शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी राहते, ज्यामुळे वारंवार रक्त संक्रमणाची गरज भासते. वारंवार रक्त संक्रमणामुळे शरीरात लोहाचे प्रमाण वाढते आणि त्याचे दुष्परिणाम अवयवांवर होतात. त्यामुळे रुग्णांना नियमितपणे ‘Iron Chelation’ औषधे घ्यावी लागतात, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिष मोहबे यांनी दिली.
या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाला. त्यानंतर जिल्हा स्तरावरही याचे उद्घाटन झाले. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिष मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत, जिल्हा माध्यम विस्तार अधिकारी विजय आखाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा समन्वयक स्वप्ना खंडाईत यांच्यासह आरोग्य विभाग, के.टी.एस. शासकीय सामान्य रुग्णालय आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी, कर्मचारी व परिचारिका उपस्थित होत्या.
डॉ. मोहबे यांनी थॅलेसेमियाच्या दोन प्रमुख प्रकारांविषयी माहिती दिली – थॅलेसेमिया मेजर, जो जन्मापासून गंभीर स्वरूपात असतो आणि ज्यात वारंवार रक्त संक्रमणाची गरज भासते; आणि थॅलेसेमिया मायनर, ज्यात व्यक्ती निरोगी असतात पण ते या आजाराचे वाहक असू शकतात.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी थॅलेसेमियाच्या प्रसाराविषयी माहिती देताना सांगितले की, दोन वाहकांनी विवाह केल्यास त्यांच्या २५% संततीला थॅलेसेमिया मेजर होऊ शकतो, ५०% संतती वाहक असू शकते आणि २५% सामान्य असू शकते. त्यामुळे विवाह करणाऱ्या जोडप्याने थॅलेसेमियाची तपासणी करणे आवश्यक आहे.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांनी सांगितले की, थॅलेसेमिया रुग्णांवर बोन मॅरो ट्रान्सप्लांटद्वारे उपचार करणे शक्य आहे आणि कोल इंडिया थॅलेसेमिया बाल सेवा योजनेअंतर्गत यासाठी मदत मिळते. पात्र रुग्णांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय, मुंबई आणि MCGMs BMT Center, बोरिवली, मुंबई येथे उपचारासाठी पाठवले जाईल.
सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांनी सांगितले की, जिल्ह्यात थॅलेसेमियाबाबत प्रभावी जनजागृती केली जाईल आणि १०४ या टोल फ्री क्रमांकावर या आजारासंबंधी माहिती उपलब्ध असेल.



