क्राईमगोंदियाविदर्भ

बापाच्या हत्येचा मुलाने घेतला सूड! ; जामिनावर सुटलेल्या तरुणाचा तलवारीने वार करून खून

पालेवाडा-हेटी येथील थरार : आरोपी रक्ताळलेली तलवार घेऊन थेट पोलीस पाटलांच्या दारी

गोंदिया : “माझ्या वडिलांचा जसा खून केला, तसाच मी ‘भुरू’ला मारले,” अशी धक्कादायक कबुली देत एका तरुणाने आपल्या वडिलांच्या हत्याऱ्याचा निर्घृण खून केला. गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा-हेटी येथे सोमवारी (१६ मार्च) रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. देवेंद्र उर्फ भुरू चुन्नीलाल ताराम (२५) असे मृत युवकाचे नाव असून, आरोपी सुनील आसाराम कांबळे (२७) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या थराराची पाळेमुळे २०२५ मध्ये घडलेल्या एका हत्येत आहेत. मृत देवेंद्र ताराम याच्यावर आरोपी सुनील कांबळे याच्या वडिलांच्या हत्येचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात देवेंद्र कारागृहात होता, मात्र अवघ्या आठ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून गावात परतला होता. आपल्या वडिलांच्या हत्याऱ्याला मोकळे फिरताना पाहून सुनीलच्या मनात संतापाची लाट होती आणि तो बदला घेण्याच्या संधीत होता.

सोमवारी रात्री ८ वाजता संधी साधून सुनीलने देवेंद्रवर तलवारीने हल्ला चढवला. त्याने देवेंद्रच्या गळ्यावर, मानेवर, हाता-पायावर आणि पोटावर एकामागून एक भीषण वार केले. वर्मी घाव बसल्याने देवेंद्र रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हत्येचे कृत्य केल्यानंतर आरोपी सुनील कांबळे हा पळून न जाता, थेट गावातील पोलीस पाटील परिमल ठाकूर यांच्या घरी पोहोचला. त्याच्या हातातील तलवार रक्ताने माखलेली होती. तिथे त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीस पाटलांनी तातडीने गोरेगाव पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असता, देवेंद्रचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला.

या हत्याकांडात सुनीलचा मोठा भाऊ हंसराज कांबळे (४३) याचाही सहभाग असल्याचा संशय बळावला आहे. प्रत्यक्षदर्शींनी तो घटनास्थळी उपस्थित असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम २५, (२), २७ (३), ४ भारतीय न्याय संहितेचे कलम १०३ (१), ५ , ३ (५), ६, ५४ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे संपूर्ण गोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button