गडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भ

पोलिसांच्या रक्ताने नवजात बाळाला मिळाले जीवदान! गडचिरोली पोलिसांची माणुसकी पुन्हा अधोरेखित; महिला अंमलदारासह पोलीस अधिकाऱ्याने केले रक्तदान

गडचिरोली पोलिसांची माणुसकी पुन्हा अधोरेखित; महिला अंमलदारासह पोलीस अधिकाऱ्याने केले रक्तदान

पोलिसांच्या रक्ताने नवजात बाळाला मिळाले जीवदान!

गडचिरोली पोलिसांची माणुसकी पुन्हा अधोरेखित; महिला अंमलदारासह पोलीस अधिकाऱ्याने केले रक्तदान

 

गडचिरोली, दि. ३१  ऑगस्ट  : कर्तव्य बजावताना कायदा-सुव्यवस्था राखण्यासोबतच गरजेच्या वेळी माणुसकीचा हात पुढे करणाऱ्या गडचिरोली पोलिसांनी पुन्हा एकदा संवेदनशीलतेचे दर्शन घडविले. एटापल्ली तालुक्यातील एका नवजात बाळाला तातडीने रक्ताची गरज भासल्यानंतर पोलीस अधिकारी आणि महिला अंमलदार यांनी स्वेच्छेने रक्तदान करून बाळाच्या उपचारासाठी मोलाची मदत केली.

एटापल्ली तालुक्यातील शांता गावडे (वय ३२) यांनी २२ ऑगस्ट रोजी हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल रुग्णालयात तिळ्या बाळांना जन्म दिला. मुदतपूर्व जन्म आणि कमी वजनामुळे तिन्ही नवजात बालकांना एनआयसीयूमध्ये विशेष वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी एका बाळाची प्रकृती अचानक खालावली. प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्याने बाळाला तातडीने ‘दृअ’ रक्तगटाच्या रक्ताची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, रुग्णालयात संबंधित रक्तगट उपलब्ध नसल्याने प्रशासनाने गडचिरोली पोलीस दलाशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेने तातडीने पुढाकार घेतला. गडचिरोली रक्त केंद्राच्या सहकार्याने रक्ताची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील ऑपरेशन सेलमध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद बंडीगरे तसेच नागरी कृती शाखेतील महिला पोलीस अंमलदार आचल कुमरे यांनी कोणताही विलंब न करता स्वेच्छेने रक्तदान केले. त्यांच्या रक्तदानामुळे नवजात बाळासाठी आवश्यक असलेल्या संबंधित रक्तगटाच्या दोन रक्तपिशव्या उपलब्ध झाल्या. वेळीच रक्त मिळाल्याने बाळाच्या उपचाराला मोठी मदत झाली असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. या प्रसंगातून गडचिरोली पोलीस दलाने ‘पोलीस म्हणजे केवळ कायदा राबविणारी यंत्रणा नव्हे, तर संकटात धावून जाणारा मदतीचा हात’ ही भावना पुन्हा अधोरेखित केली.

नवजात बाळाचे आई-वडील तसेच रुग्णालय प्रशासनाने गडचिरोली पोलिसांच्या तत्परतेबद्दल आणि माणुसकीच्या भावनेतून केलेल्या मदतीबद्दल मनःपूर्वक आभार मानले. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनीही वेळेचे महत्त्व ओळखून रक्तदान करणाऱ्या पोलीस अधिकारी व महिला अंमलदारांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button