गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

५८ चकमकींमध्ये १०१ माओवाद्यांना कंठस्नान ; ‘शौर्यवान’ पार्टी कमांडर वासुदेव मडावी यांचा गौरव

गडचिरोली: माओवादविरोधी अभियानात अतुलनीय शौर्य दाखवणारे पोलीस उपनिरीक्षक वासुदेव राजम मडावी यांचा गडचिरोली पोलीस दलातर्फे विशेष गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. मागील २६ वर्षांच्या सेवेत त्यांनी ५८ चकमकींमध्ये सहभागी होऊन एकूण १०१ माओवाद्यांना कंठस्नान घालण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.

१९९८ मध्ये पोलीस शिपाई म्हणून गडचिरोली पोलीस दलात रुजू झालेले वासुदेव मडावी हे आता पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना तीन वेळा वेगवर्धित (accelerated) पदोन्नती मिळाली आहे. त्यांनी आतापर्यंत एकूण ५८ चकमकींमध्ये थेट सहभाग घेतला आहे. यात बोरीया कसनासूर (४० माओवाद्यांना कंठस्नान), गोविंदगाव (६ माओवाद्यांना कंठस्नान), मर्दिनटोला (२७ माओवाद्यांना कंठस्नान), कोपर्शी-कोढूर (५ माओवाद्यांना कंठस्नान) आणि कतरंगट्टा (३ माओवाद्यांना कंठस्नान) यांसारख्या मोठ्या चकमकींचा समावेश आहे. बुधवारी (दि.२७) झालेल्या कोपर्शी चकमकीत त्यांनी आणखी ४ माओवाद्यांना कंठस्नान घालून आपला विक्रम १०१ पर्यंत पोहोचवला. यासोबतच, त्यांनी ५ जहाल माओवाद्यांनाही अटक केली आहे.

वासुदेव मडावी यांच्या असामान्य शौर्यासाठी त्यांना ‘पोलीस शौर्य पदक’ प्रदान करण्यात आले आहे आणि आणखी दोन पदकांचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. याव्यतिरिक्त, त्यांना ‘असाधारण आसूचना कुशलता पदक’ आणि ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ देखील मिळाले आहे.

४८ व्या वर्षीही ते C-60 पथकाचे एक महत्त्वाचे पार्टी कमांडर म्हणून काम करत आहेत. त्यांच्या या शौर्याबद्दल आणि समर्पित सेवेबद्दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी त्यांचे अभिनंदन केले. वासुदेव मडावी यांच्या कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षा राखण्याच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button