गडचिरोलीविदर्भ

२०० वर्षांची परंपरा: अहेरीच्या ऐतिहासिक दसऱ्यात उसळला जनसागर

अम्ब्रीशराव आत्राम यांचा विरोधकांवर घनाघात

अहेरी : अहेरी इस्टेटची २०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला दसरा महोत्सव २ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. यावेळी राजघराण्यावर प्रेम करणाऱ्या शेकडो नागरिकांनी अहेरी इस्टेटमधील पाचही तालुक्यांतून तसेच बाजूच्या राज्यांतून हजेरी लावत जनसागर उसळला होता.

माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे सहावे श्रीमंत राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी पालखीतून विराजित होऊन गडअहेरी येथे सिमोल्लंघन केले आणि शमी वृक्षाचे तसेच गडी मातेचे पारंपरिक पूजन केले.

घटस्थापनेच्या दिवसापासूनच राजमहालात आप्तस्वकीयांची गर्दी झाली होती. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १ ऑक्टोबर रोजी पालखी काढून आलापल्ली रोड जवळील तलावात शस्त्रपूजन करण्यात आले. दसऱ्याच्या दिवशी, २ ऑक्टोबरला सकाळी साईबाबांच्या पालखीची शोभायात्रा स्थानिक शहरातून काढण्यात आली. सायंकाळी ६ वाजता राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या पालखीचे भव्य जनसागराच्या उपस्थितीत विजयादशमीचे सिमोल्लंघन करण्यासाठी प्रस्थान झाले.

सिमोल्लंघनानंतर रात्री ९ वाजता राजमहालाच्या प्रांगणात सर्व बंधू-भगिनींना राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. यावेळी व्यासपीठावर अवधेशराव बाबा आणि राजपरिवारातील इतर सदस्य उपस्थित होते.

अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर जोरदार घनाघात केला. “भारतातील अशा एकमेव दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताला काही लोक राजकारण करून बिघडविण्याचा प्रयत्न करतात,” असे ते म्हणाले. त्यांनी विशेषकरून आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर ताशेरे ओढले. “इलाख्यात प्रथम अहेरीचा दसरा होतो आणि त्यानंतर बाकी दसरे होतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अम्ब्रीशराव आत्राम यांनी मतदारसंघातील समस्यांवरून जनतेला भावनिक साद घातली. “आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रात रस्त्यांवरील खड्डे आणि अन्य अनेक समस्या आहेत. आपण काय विश्वास ठेवून त्यांना मत दिले? आता आपण पाच वर्ष त्याचे भोग भोगत असून, चुकीचा निर्णय झाला आहे. तो दुरुस्त करण्याची वेळ आता जनतेवर आली आहे,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

संपूर्ण सोहळ्यादरम्यान हजारो नागरिकांची उपस्थिती लक्षात घेता, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाचे संचालन नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button