
आधुनिक वैद्यकीय सुविधेमुळे आदिवासी भागातील महिलांना मोठा दिलासा ; ४८ रुग्णांची झाली होती नोंदणी
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील मातांचे आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आयोजित लॅप्रोस्कोपी (दुर्बिणीद्वारे) स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी ठरले. या शिबिरात एकूण ४८ नोंदणीकृत महिलांपैकी २८ महिलांवर आधुनिक पद्धतीने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा एस. लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिराचे मुख्य आकर्षण ‘लॅप्रोस्कोपी’ पद्धत होती. या तंत्रज्ञानाचे फायदे आहेत: बिनटाका पद्धत: ही शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित असून यात टाके घालण्याची गरज नसते. कमी वेदना आणि जलद आराम: पारंपारिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत यात रुग्णाला कमी वेदना होतात आणि त्या लवकर बऱ्या होतात. थोड्या कालावधीसाठी भरती: रुग्णांना केवळ दोन दिवस रुग्णालयात राहावे लागते, ज्यामुळे त्यांच्या वेळेची बचत होते.
या शिबिरात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, वैद्यकीय अधीक्षक, महिला व बाल रुग्णालय डॉ. माधुरी किलनाके, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शशिकांत बद्देला, डॉ. हिना उंदीरवाडे, शल्य चिकित्सक डॉ. कृणाल चेंडकापूरे, डॉ. नागसेन साखरे, डॉ. मित्तल गेडाम, भूलतज्ज्ञ: डॉ. हेमंतकुमार मडावी. यांनी आपली सेवा दिली. या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा रुग्णालयातील परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
यावेळी बोलताना डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले की, “ग्रामीण आणि आदिवासी भागातील रुग्णांना आधुनिक सोयी-सुविधा जिल्ह्याच्या ठिकाणीच उपलब्ध करून देणे हे आमचे कर्तव्य आहे. अशा शिबिरांमुळे रुग्णांना उपचारासाठी नागपूर किंवा इतर मोठ्या शहरांत जाण्याची गरज पडणार नाही.” भविष्यात अशी शिबिरे उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावरही आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या शिबिरासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयातून महिला रुग्ण आल्या होत्या. आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे कुटुंब नियोजनाच्या बाबतीत जनजागृती होण्यास मदत झाली आहे.



