भंडाराविदर्भ

विशेष रोजगार मेळाव्यात ६४ उमेदवारांची प्राथमिक निवड

‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ उत्साहात ; ७ नामांकित कंपन्या सहभागी

भंडारा : जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक-युवतींना खाजगी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भंडारा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा, माँ चंडिका देवस्थान पवनी आणि युवाशक्ती संघटना पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त ३० सप्टेंबर रोजी माता चंडिका मंदिर सभागृह, पवनी येथे हा मेळावा संपन्न झाला.

या विशेष रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रांतील ७ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला, ज्यांच्यामार्फत एकूण ४९३ रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. मेळाव्यात एकूण १८६ उमेदवारांनी (१४६ पुरुष आणि ४० महिला) नोंदणी केली होती. प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या ११० उमेदवारांनी मुलाखती दिल्या. या मुलाखतीतून ६४ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. मेळाव्याचे उद्घाटन युवाशक्ती संघटना पवनीचे अध्यक्ष तथा व्यापारी संघटनाचे अध्यक्ष देवराज बावनकर यांच्या हस्ते झाले.

सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी युवक-युवतींना मार्गदर्शन करताना सांगितले की, खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. उमेदवारांनी सुरुवातीला कमी मानधन न पाहता मेहनतीने यशाची शिखरे गाठावीत आणि आवश्यक कौशल्ये आत्मसात करून संधी प्राप्त करावी.

यावेळी पवनी येथील प्राचार्य निता पिसे यांनी जिल्ह्याच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये लवकरच अल्पकालावधीचे कौशल्य प्रशिक्षण सुरू होणार असल्याची माहिती दिली, ज्याचे उद्घाटन ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान करणार आहेत. जास्तीत जास्त उमेदवारांनी यात प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

या मेळाव्यात एलआयसी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स आणि श्रीराम फायनान्स लिमिटेड यांसारख्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button