चंद्रपूरविदर्भ

शेतकऱ्याने पेटवले सहा एकरातील सोयाबीन

कोरपना तालुक्यातील कढोली येथील घटना; २५ हजार रुपयांचा खर्च आणि संपूर्ण उत्पादन वाया

गडचांदूर : अवकाळी आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याच्या मेहनतीचे अक्षरशः ‘राख’ झाली आहे. कोरपना तालुक्यातील कढोली (खु.) येथील शेतकरी प्रशांत महादेव मसे यांनी सहा एकर क्षेत्रात पिकवलेले सोयाबीन पावसाच्या तडाख्यामुळे पूर्णपणे खराब झाले. अखेर, कोणतेही पर्याय न उरल्याने ओला झालेला सोयाबीनचा ढिगारा जाळून टाकण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर ओढवली आहे.

प्रशांत मसे यांनी या हंगामात सहा एकर क्षेत्रात सोयाबीनची लागवड केली होती. पीक कापणी करून त्यांनी ढिगारा तयार केला होता. अनियमित आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे हा ढिगारा ओला झाला. पाऊस थांबल्यावर त्यांनी सोयाबीन वाळवण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा आलेल्या पावसाने सर्व प्रयत्न फोल ठरवले. थ्रेशर चालकांनी ओला ढिगारा असल्याने दाणे काढण्यास स्पष्ट नकार दिला. परिणामी, सोयाबीन जागेवरच सडण्याची आणि दुर्गंधी पसरण्याची भीती निर्माण झाली. शेवटी पर्याय नसल्याने हताश झालेल्या मसे यांनी तो संपूर्ण ढिगारा जाळून टाकला.

या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे २५ हजार रुपयांचे कापणीवरील खर्च तसेच सहा एकर क्षेत्रातील संपूर्ण उत्पादन वाया गेले आहे. या अस्मानी संकटामुळे प्रशांत मसे यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button