गडचिरोली वनविभागातर्फे ‘निसर्ग अनुभव’ कार्यक्रम : बुद्ध पौर्णिमेला गुरवळा सफारीत प्राणीगणना

निसर्गप्रेमींना वन्यजीवांचे जवळून दर्शन घेता येणार
गडचिरोली: गडचिरोली वनविभागाच्या वतीने बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने, सोमवार, १२ मे रोजी गुरवळा नेचर सफारी येथे ‘निसर्ग अनुभव’ या विशेष उपक्रमांतर्गत प्राणीगणना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रवीण पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला जात आहे.
या कार्यक्रमासाठी गुरवळा नेचर सफारी परिसरातील वनक्षेत्रात एकूण १० मचाणे उभारण्यात आली आहेत. प्रत्येक मचानावर एकावेळी ३ ते ४ व्यक्ती बसून वन्यजीवांचे निरीक्षण करू शकतील. यात विविध पाणवठ्यांवर तयार केलेल्या लाकडी आणि लोखंडी मचाणांचा समावेश आहे. प्राणीगणना प्रत्यक्षदर्शी निरीक्षणासोबतच ट्रॅप कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखील केली जाणार आहे. निसर्गप्रेमी, वन्यजीव अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी हा एक अनोखा अनुभव असणार आहे.
या उपक्रमात सहभागी निसर्गप्रेमींना रात्रीच्या थरारक वातावरणात विविध वन्यजीवांचे दर्शन घेण्याची संधी मिळेल. विशेषतः वाघ, बिबट, अस्वल, तडस, कोल्हा, चितळ, भेकर, चौशिंगा, नीलगाय आणि रानडुक्कर यांसारख्या प्राण्यांचे तसेच विविध पक्ष्यांचे निरीक्षण करता येणार आहे.
या ‘निसर्ग अनुभव’ उपक्रमासाठी गडचिरोली वनविभागामार्फत प्रति व्यक्ती शुल्क रुपये १०००/- आकारले जाणार आहे. पर्यटकांना त्यांच्या भोजनाची व्यवस्था स्वतःच करावी लागणार आहे. मांसाहार, मसालेदार किंवा तीव्र वास असलेले भोजन सोबत आणण्यास सक्त मनाई आहे. गडचिरोली वनविभागातील गुरवळा नेचर सफारी येथील पाणवठ्यांची स्वच्छता, दुरुस्ती, पाण्याची व्यवस्था आणि मचाण उभारणीची कामे पूर्ण झाली आहेत.
या कार्यक्रमाचे नियोजन वनसंरक्षक (प्रा.) गडचिरोली वनवृत्त रमेश कुमार, उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व वनपरिक्षेत्राधिकारी गडचिरोली अरविंद पेंदाम यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समिती गुरवळा व हिरापूरचे अध्यक्ष विशेष सहकार्य करत आहेत. वनपरिक्षेत्र गडचिरोली येथील क्षेत्र सहायक गुरवळा विजय जनबंधू तसेच वनपाल, वनरक्षक, वनमजूर आणि सफारी येथील गाईड कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा : अतुल: ८२७५८४०२०८ लंकेश: ८३०८५३६६४९



