गडचिरोलीविदर्भ

गावात दारू व खर्रा विक्री करताना आढळून आल्यास आकारणार १० हजारांचा दंड

धुडेपल्लीत लग्न समारंभही होणार दारूमुक्त

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या धुडेपल्ली गावात अवैध दारूविक्री बंद आहे. ही बंदी कायम टिकवून ठेवण्यासह खर्रा विक्री करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्याचा ठराव मुक्तिपथ गाव संघटनेच्या बैठकीत ग्रामस्थानी घेतला. विशेष म्हणजे, लग्न सोहळे शांततेत पार पडावे, याकरिता दारूमुक्त विवाह करण्याच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा करण्यात आली.

धुडेपल्ली गावात आदिवासी समुदायाचे लोक वास्तव्यास आहेत. येथील लोक शेती, शेती पूरक व्यवसाय व वनोपज गोळा करून उदरनिर्वाह करतात. ग्रामस्थानी आपल्या गावात अवैध दारूविक्री बंद ठेवली आहे. नुकतीच मुक्तीपथ व ग्रामस्थांची बैठक पार पडली असता, अवैध दारूविक्री बंदी कायम टिकवून ठेवणं व खर्रा विक्री थांबविण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. मुक्तीपथ तालुका संघटिका नीळा किन्नाके यांनी अवैध दारूविक्री बंदी टिकवून ठेवण्याच्या उपाययोजना सांगितल्या. सोबतच कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारांना आमंत्रण देणाऱ्या खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, मुक्तिपथ गाव संघटना पुनर्गठित करून दारूविक्री व खर्रा विक्री बंदीचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.नियमांचे उल्लंघन केल्यास 10 हजार रुपये दंडात्मक कार्यवाही होणार, विक्रेत्यांची माहिती देणाऱ्यास  2 हजार रुपये बक्षीस, दुकानात लहान मुलांना खर्रा आणायला पाठविणाऱ्यांवर  500 रुपये दंड, दारु पिऊन कार्यक्रमात दंगा केल्यास 1 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच दारूमुक्त लग्न या संकल्पनेवर चर्चा करून सकारात्मक होकार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यावेळी गाव संघटनेच्या सदस्यांसह, गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button