
केंद्र सरकार व भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेविरोधात जोरदार घोषणाबाजी; दोषींवर कठोर कारवाईची मनविसेची आक्रमक मागणी
गडचिरोली : देशाची राजधानी दिल्ली येथील जंतरमंतरवर लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे ज्येष्ठ समाजसेवक व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्यावर पोलिसांनी केलेली धक्काबुक्की व दडपशाही, तसेच ‘नीट’ (NEET) सह विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने येथील स्थानिक इंदिरा गांधी चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकार व प्रशासनाच्या दमनकारी धोरणांविरोधात, तसेच भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आक्रमक निदर्शनांमुळे इंदिरा गांधी चौक परिसर चांगलाच दणाणला.
आंदोलनादरम्यान मनविसेच्या वक्त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “शांततापूर्ण व सनदशीर मार्गाने विद्यार्थ्यांच्या व पर्यावरणाच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या सोनम वांगचुक यांना अंधारात ठेवून जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करणे, त्यांच्यावर धक्काबुक्की करणे आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे ही थेट लोकशाहीची हत्या आहे. दुसरीकडे NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांचे पेपर वारंवार फुटत असल्याने देशातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. सरकार आणि प्रशासन या पेपर फुटीच्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे,” असा संतप्त आरोप वक्त्यांनी केला.
मनविसे गडचिरोलीच्या वतीने सोनम वांगचुक यांच्यावरील अन्यायकारक कारवाई त्वरित थांबवण्याची आणि पेपर फुटीप्रकरणी जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय देण्याची ठाम मागणी करण्यात आली. या मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा मनविसेने दिला आहे.
या आंदोलनात मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश संतोषवार, मनविसे शहराध्यक्ष शुभम कमलापूरवार, मनविसे सचिव आकाश कुळमेथे, मनविसे तालुका अध्यक्ष शुभम देवोजवार यांच्यासह संतोष राजकोंडावार, ओमप्रकाश कपाटे, रजत गेटलेवार, उमाकांत साळवे, लक्ष्मीकांत साळवे, ध्रुव धात्रक, रोहीत कनाके, स्वप्नील पानसे, हिमांशू संतोषवार, क्रिश खोबरे, आर्यन ठाकूर, मयुर खोबरे, अमोल देवजवार, यशवंत पीपरे, चंद्रशेखर जेल्लेवार आणि सागर गजलपल्लीवार यांच्यासह मनविसेचे इतर सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



