
भंडारा: जून महिन्यातील पावसाची सारी नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर, जुलै महिना उजाडताच जिल्हाभरात झालेल्या दमदार पावसामुळे शेतशिवार हिरवेगार झाले आहे. या संततधार पावसामुळे वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द धरणाची जलपातळी वेगाने वाढली असून, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या प्रकल्पाचे सर्वच्या सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडले आहेत. सद्यस्थितीत धरणातून ३७०६.९८ क्युमेक वेगाने वैनगंगा नदीत पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या पावसाळी हंगामात पहिल्यांदाच वैनगंगा नदीची जलपातळी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, धरणाचे सर्व ३३ दरवाजे ०.५ मीटरने उघडण्याची वेळ आली आहे. गोसीखुर्द धरणासोबतच धापेवाडा प्रकल्पातूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने वैनगंगेच्या पात्रात मोठी वाढ झाली आहे. वैनगंगा नदी आणि गोसीखुर्द प्रकल्पाच्या ‘कॅचमेंट एरिया’मधून (पाणलोट क्षेत्र) येणाऱ्या पाण्याची आवक अशीच सुरू राहिल्यास, धरणाचे दरवाजे अर्धा मीटरपेक्षा अधिक उंचीवर उघडले जाण्याची शक्यता धरण प्रशासनाने वर्तवली आहे.
भंडारा व शेजारील जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पुजारीटोला धरणाची जलपातळी देखील वाढली आहे. या प्रकल्पात सध्या ८०.०१ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा जमा झाला असून, खबरदारी म्हणून धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. येथून सध्या ८६ क्युमेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
एकीकडे गोसीखुर्द आणि पुजारीटोला धरणांमधून विसर्ग सुरू असताना, दुसरीकडे बावनथडी आणि संजय सरोवर प्रकल्पांमध्ये मात्र अद्याप समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. बावनथडी प्रकल्पात सध्या अवघा १४.३९ टक्के, तर संजय सरोवर प्रकल्पात १५.९० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांचे दरवाजे सध्यातरी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत.
वैनगंगा नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आणि मच्छिमारांनी नदीपात्रात उतरू नये, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



