
कुरखेडा : तालुक्यात व्यसनाधीनतेवर आळा घालण्यासाठी आणि अवैध तंबाखू व दारू नियंत्रणासाठी नुकतीच कुरखेडा येथे मुक्तीपथ तालुका समितीची आढावा बैठक तहसीलदार आर. एम. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत तालुक्यातील शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करणे आणि गावोगावी व्यसनविरोधी जनजागृती रॅली काढण्यासह विविध महत्त्वपूर्ण कृती कार्यक्रमावर भर देण्यात आला.
बैठकीत कोटपा (COTPA) कायदा २००३ अन्वये प्रत्येक तालुका पातळी पथकाच्या माध्यमातून, दारू व तंबाखूमुक्त कार्यालय तसेच अवैध विक्री रोखणे करिता महिन्यातून दोन वेळा दंडात्मक कार्यवाही करावी. सर्व शासकीय कार्यालये तातडीने तंबाखूमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जयंती आणि सणासुदीच्या काळात शहर व ग्रामीण भागातील शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने ‘व्यसनविरोधी जनजागृती रॅली’ काढून नागरिकांमध्ये प्रबोधन करावे. शहरात महिला, पुरुष आणि युवकांनी पुढाकार घेऊन व्यसनमुक्ती समित्या स्थापन कराव्यात. यासाठी नगरपंचायतच्या नगरसेवकांनी आपल्या वॉर्डात समित्या स्थापन करण्यासाठी मदत करावी आणि स्वतः त्यात सक्रिय सहभागी व्हावे. जंगलात अवैध मोहफुलाच्या भट्ट्या किंवा मोहसळवा आढळून आल्यास वनविभागाने तातडीने पोलीस विभागाला कळवून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. तालुक्यातील प्रत्येक शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
तहसीलदार आर. एम. पाटील यांनी या सर्व मोहिमेत प्रत्येक विभागाने सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. बैठकीला पोलीस निरीक्षक वाघ, संवर्ग विकास अधिकारी धीरज पाटील, गटशिक्षणाधिकारी प्रवीण शिवणकर, समुपदेशक निशा चचाने, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे नरहरी बोरकुटे, गुरुदेव सेवा मंडळाचे माकडे, मुक्तीपथ तालुका संघटिका शारदा मेश्राम, वनपाल मेश्राम, प्रा. शेंडे, शिरपूरकर, नसीर हाशमी, युवा संघटनेच्या रुपाली कावळे, मिनाक्षी नाकाडे, मुक्तीपथचे जीवन दहिकर, अतुल पोरटे यांसह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.



