
घरकुल यादीत नाव टाकण्यासाठी मागितली लाच ; मोहाडी तालुक्यातील विहीरगाव येथे एसीबीची कारवाई
भंडारा : घरकुल यादीच्या पहिल्या टप्प्यात तक्रारदाराच्या वडिलांचे नाव मंजूर करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना विहीरगाव (ता. मोहाडी) येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ४) दुपारी करण्यात आली. प्रफुल्ल रतन गिरी (वय ४६) असे ग्रामसेवकाचे नाव आहे.
मे २०२५ मध्ये विहीरगाव ग्रामपंचायतीत घरकुलासाठी सेल्फ सर्वे करण्यात आला होता. सर्वेनंतर तक्रारदाराच्या वडिलांचे नाव घरकुल यादीच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक गिरी याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. संबंधित तक्रारकर्त्याने २८ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर ४ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयातच एसीबीच्या पथकाने सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारताना ग्रामसेवक प्रफुल्ल गिरी याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. पथकाने त्याच्याकडून लाचेची १५ हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. कारवाईनंतर ग्रामसेवकाच्या घराचीही झडती घेण्यात आली.
या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भंडारा एसीबीचे पोलीस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देशमुख यांनी पथकासह केली.



