गोंदियाविदर्भ

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियान: उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला आढावा; मतदारांशी थेट संवाद

गोंदिया: जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या ‘विशेष संक्षिप्त पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेला गती देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. शिरपूर बांध (ता. देवरी) येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय अवधाने यांनी शनिवारी बीएलओ (BLO) सहाय्यकांच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या मोहिमेत ग्रामीण भागातील बीएलओ सहाय्यकांचा उत्साह आणि गावकऱ्यांशी असलेला त्यांचा थेट संपर्क, मतदार यादी पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला अधिक प्रभावी बनवत असल्याचे दिसून आले.

या पाहणी दौऱ्यात उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय अवधाने यांनी कामकाजाची सखोल पाहणी केली. काम केवळ पूर्ण करण्यावर भर न देता, ते जलद गतीने आणि पूर्णतः गुणवत्तापूर्ण असावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. यावेळी अपर तहसीलदार (चिचगड) नवनाथ कातकडे आणि तहसीलदार (देवरी) धनंजय देशमुख हे विशेषत्वाने उपस्थित होते.

या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे दूरवर्ती ग्रामीण भागातील बीएलओ सहाय्यकांचा सक्रिय सहभाग. हे सहाय्यक स्थानिक असल्याने, मतदारांशी त्यांचा सहज संपर्क प्रस्थापित होत आहे. परिणामी, मतदार यादीतील नावे नोंदणी, दुरुस्ती किंवा वगळण्याची प्रक्रिया अधिक अचूकपणे पार पडत आहे. अवधाने यांनी बीएलओ सहाय्यकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार यादी ही अत्यंत महत्त्वाची असते. जास्तीत जास्त पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट व्हावीत आणि यादी त्रुटीमुक्त असावी, या उद्देशाने प्रशासनाने ही मोहीम राबविली आहे. या मोहिमेमुळे देवरी तालुक्यातील दुर्गम भागातील मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे झाले असून, पुनरीक्षण प्रक्रियेने वेग घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button