भंडाराविदर्भ

जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय विभागाची मोहीम ; सातही तालुक्यांत विशेष जनजागृती अन् नोंदणी शिबिरे

मच्छीमारांसाठी किसान क्रेडिट कार्ड, अपघात विमा अन् वीजदरात सवलत; डॉ. पल्लवी पाखमोडे यांचे योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

भंडारा : जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट तळागाळातील मच्छीमार व मत्स्यव्यवसायिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मत्स्यव्यवसाय कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये विशेष जनजागृती व लाभार्थी नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाच्या या उपक्रमाला जिल्ह्यातील मच्छीमार, मत्स्यपालक आणि मत्स्य सहकारी संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांविषयी उपस्थित नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये किसान क्रेडिट कार्ड (KCC), मत्स्यव्यवसाय प्रकल्पांसाठी वीजदरात मिळणारी सवलत, अपघात गट विमा योजना आणि मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना यांसारख्या विविध सवलतींची माहिती देण्यात आली. तसेच KCC व अपघात विम्यासंदर्भात पात्र लाभार्थ्यांकडून प्रत्यक्ष अर्जही स्वीकारण्यात आले.

₹२ लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या खेळत्या भांडवली कर्जावर केंद्र शासनाकडून ३ टक्के व राज्य शासनाकडून ४ टक्के व्याज परतावा. केंद्र पुरस्कृत अपघात गट विमा योजनेअंतर्गत मच्छीमारांना ₹५ लाखांचे विमा संरक्षण. NFDP नोंदणी, ई-श्रम कार्ड, मासेमारी साधनांसाठी अर्थसहाय्य आणि वीजदरातील सवलतीबाबत मार्गदर्शन.

मच्छीमार व मत्स्यव्यवसायिकांना शासनाच्या योजना गावपातळीवर उपलब्ध करून देणे, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आणि शाश्वत मत्स्यव्यवसायाला प्रोत्साहन देणे हा या संपूर्ण अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

“भविष्यातही अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम, प्रशिक्षण शिबिरे आणि लाभार्थी नोंदणी उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व पात्र मच्छीमार व मत्स्यव्यवसायिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या व क्षेत्राच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हावे.”

— डॉ. पल्लवी केशव पाखमोडे (सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, भंडारा)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button