गडचिरोलीविदर्भ

अगरबत्ती प्रकल्प, ट्रॅक्टर खरेदी-विक्री, चिचडोह बॅरेज प्रकरणातील पिडीत महिलांचे तिसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच ; चार महिलांची प्रकृती खालावली

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त महिलांचा आत्मदहनाचा इशारा ; एसआयटी चौकशीची मागणी

गडचिरोली : एकीकडे सरकार ‘लाडकी बहीण’ योजना राबवत असल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात शेकडो महिला आपल्या हक्काच्या पैशांसाठी आणि न्यायासाठी मृत्यूशी झुंज देत आहेत. चामोर्शी येथील नगरसेवक आशिष पिपरे आणि नगरसेविका सोनाली पिपरे यांनी गरीब शेतकरी व मजुरांची फसवणूक केल्याचा आरोप करत पीडित महिलांचे आमरण उपोषण गुरुवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उपोषणास बसलेल्या चार महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष पिपरे यांनी राजकीय दबाव आणि बड्या नेत्यांच्या नावाचा वापर करून तीन मुख्य प्रकरणांत लूट केली आहे: १. अगरबत्ती प्रकल्प फसवणूक: आर. एन. ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक झाली. जिल्हा उद्योग केंद्रावर दबाव टाकून चौकशी रोखल्याचा आरोप आहे. २. ट्रॅक्टर खरेदी-विक्री घोटाळा: ट्रॅक्टर खरेदीच्या नावाखाली गरीब शेतकऱ्यांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करण्यात आली. यावर पोलीस अधीक्षकांना पत्र देऊनही कारवाई झाली नाही. ३. चिचडोह बॅरेज जमीन रजिस्ट्री प्रकरण: चिचडोह बॅरेजच्या भूसंपादनात जास्तीचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका अंध शेतकऱ्याच्या कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या आणि ४ लाखांची लूट केली. याची तक्रार करणाऱ्या शाालिनी पिपरे यांची तक्रारही नोंदवली गेली नाही.

आश्चर्याची बाब म्हणजे, या प्रकरणातील पीडितांनी मार्च २०२५ मध्ये नागपूरच्या ‘जनता दरबारात’ स्वतः मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. मुख्यमंत्री सचिवालय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी (२४/०४/२०२५ आणि ०३/१२/२०२५) पोलीस अधीक्षक आणि संबंधित विभागांना कारवाईचे आदेश दिले. मात्र, आशिष पिपरे यांच्या राजकीय वजनामुळे आणि अधिकाऱ्यांवरील दबावामुळे आजपावेतो एकही ठोस पाऊल उचलले गेले नाही.

२३ फेब्रुवारी २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणात महिलांची स्थिती चिंताजनक आहे. “२०२० पर्यंत ज्यांच्या घरावर बँकेची जप्ती आली होती, त्यांच्याकडे गेल्या ५ वर्षांत अमाप संपत्ती आली कोठून? या सर्व प्रकरणांची ‘SIT’ चौकशी झालीच पाहिजे. जर प्रशासनाला जाग आली नाही, तर आम्ही आत्मदहन करू,” असा संतप्त इशारा पीडित महिलांनी दिला आहे.

कविता किरमे, देवांगना गौतम, निवृत्ता गव्हारे, शिला धोडरे, कविता कारडे, सुषमा धोडरे, रेखा गव्हारे, छाया बोदलकर, वेणू धोडरे, अनिता पिपरे, मनिषा गव्हारे, सुषमा बुरांडे, अर्चना बुरांडे, शारदा पिपरे, साधना धोडरे, जयश्री पिपरे, वंदना कोठारे, अर्चना धोडरे आणि अश्विनी गव्हारे, शालिनी पिपरे या महिला न्यायासाठी ठाम आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button