गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीकरांना मोठा दिलासा! गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीत पाणी सोडण्यास मंजुरी; ५ जूनपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार

पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; नदी पात्रात तात्पुरत्या बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर सुरू

गडचिरोली : गडचिरोली शहरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गडचिरोली नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी गेल्या पाच दिवसांपासून प्रशासकीय पातळीवर लावलेला धडक पाठपुरावा अखेरीस यशस्वी ठरला आहे. गडचिरोलीकरांची तहान भागवण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पातून वैनगंगा नदी पात्रात येत्या ३ जूनपासून पाणी सोडण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे येत्या ५ जूनपासून गडचिरोली शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्यास मोठी मदत मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या गडचिरोलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या पाणी समस्येवर सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी सविस्तर चर्चा करून २९ मे रोजी अधिकृत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी भंडारा आणि गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे वैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली.

या गंभीर समस्येची दखल घेत १ जून रोजी जिल्हाधिकारी भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत वैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली. यासाठी सभापती भरडकर यांनी स्वतः भंडाराचे पालकमंत्री पंकज भोयर, जिल्हाधिकारी भंडारा, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंता यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून गडचिरोली शहरातील पाणीटंचाईची भीषण वास्तवता मांडली होती. सध्या हा प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या नागपूर येथील सचिवांकडे अंतिम तांत्रिक मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, ३ जूनपासून गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार आहे.

गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडल्यानंतर ते वाहून न जाता पाणी पुरवठा केंद्राजवळ अडकता यावे, यासाठी नगर परिषदेच्या वतीने अतिशय योग्य नियोजन करण्यात आले आहे. वैनगंगा नदी पात्रात माती आणि रेती टाकून तात्पुरत्या बंधाऱ्याचे बांधकाम नगर परिषदेने युद्धपातळीवर सुरू केले आहे. ३ जूनपर्यंत हे बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, पाणी पोहोचताच शहराचा पाणीपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

नदीचे पाणी शहरात पोहोचून नळांना पाणी येईपर्यंतच्या मधल्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध आहे. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना तात्काळ दिलासा देण्यासाठी नगर परिषदेचे दोन स्वतःचे पाण्याचे टँकर आणि आणखी एक खासगी टँकर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या तीन टँकरच्या माध्यमातून शहरातील विविध पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये पाणी पुरविले जात असून नागरिकांना अल्प प्रमाणात का होईना, पण पाणी उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button