गडचिरोलीविदर्भ

आ. शरद सोनवणे यांच्या विरोधात गडचिरोलीत आदिवासी समाजाचा रोष; आमदारकी रद्द करण्याची मागणी

आदिवासी विकास मंत्र्यांबद्दल अवमानकारक भाषेमुळे संताप; ‘अत्याचार प्रतिबंध कायद्या‘अंतर्गत कारवाईची मागणी

गडचिरोली : जुन्नूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नूरमधील एका आढावा बैठकीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक ऊईके यांच्याविषयी अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप करत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि जंगोरायताड महिला विकास संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात, आमदार सोनवणे यांनी अनुसूचित जमातीच्या मंत्रीविषयी असभ्य आणि द्वेषपूर्ण भाषा वापरून संपूर्ण समाजाचा अपमान केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही कृती अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत येते, असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. यासोबतच, अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा अधिकार नाही, असे म्हणत त्यांची आमदारकी रद्द करण्याची ठाम भूमिकाही संघटनांनी घेतली आहे.

निवेदनाद्वारे आदिवासी समाजाने आपल्या स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित केला असून, राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी विकास परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, जिल्हा उपाध्यक्ष वामन जुनघरे, उमेश ऊईके, सुरज मडावी, प्रफुल्ल कोडाप, जंगोरायताड महिला संघटनेच्या अध्यक्षा आरती कोल्हे यांच्यासह विद्या दुग्गा, तनुजा कुमरे, लीना कोकोडे, स्मिता नैताम, रोहिणी मसराम, अर्चना टेकाम, मालता पुडो, गीता तुमराम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button