
५० हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल
चंद्रपूर : बल्लारपूर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा याच्याविरुद्ध ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सोमवारी ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे लाकूड, बांबू, तेंदूपत्ता इत्यादी मालावर कमिशन आकारून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ट्रकने माल पोहोचविण्याचे काम आहे. ऑगस्ट महिन्यात तक्रारदार यांनी १९ लाख २ हजार रुपयांचा तेंदूपत्त्याचा माल गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी येथे पोहोचविलेला होता. त्या मालाची रक्कम व्यापाऱ्यांकडून येणे बाकी होती. तीन-चार महिन्यांपासून संबंधित व्यापारी पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने तक्रारदाराने पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे लेखी तक्रार दिली होती. यादरम्यान पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा यांनी व्यापाऱ्यांकडून १९ लाख २ हजार रुपये वसूल करून देण्यासाठी एकूण रकमेच्या २० टक्के रकमेची (अंदाजे ३ लाख ८० हजार रु.) मागणी केली होती. तथापि नंतर व्यापारी तक्रारदार यांच्यामध्ये समझोता होऊन प्रकरण आपसात मिटले.
या पश्चात तक्रारदारने व्यापाऱ्यांविरुद्ध दिलेली लेखी तक्रार मागे घेत असल्याबाबत पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा यांना सांगितले असता शहा तक्रारदाराला वारंवर फोन करून पैशांची मागणी करु लागले. तसेच वरिष्ठांकडून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवू लागले. अखेर सततच्या मानसिकी त्रासाला वैतागून तक्रारदाराने जानेवारी २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा याने तक्रारदारासोबत तडजोड करून ५० हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्यावरून सापळा रचला गेला, तथापि संशय आल्यावर शहाने घटनास्थळावरून पळ काढला. हुसेन शहाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले, पोलिस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर तसेच चापोशि संदीप मो.प.वि. चंद्रपूर यांनी केली.



