
विजय वडेट्टीवार यांचे माजी समर्थक; आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत प्रवेश
गडचिरोली : तालुक्यातील शिवणीच्या सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्या वैशाली ताटपल्लीवार यांचे पती किरण ताटपल्लीवार यांची १६ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी किरण ताटपल्लीवार यांनी काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना जिल्हा उपाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. राजकीय वर्तुळात ताटपल्लीवार हे यापूर्वी विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित होते. त्यांच्या या पक्षबदलामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
या बैठकीला माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला जिल्हाध्यक्षा डॉ. सोनल कोवे, रायुकाँ जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर आदी प्रमुख नेते उपस्थित होते.



