
अहेरी येथे कार्यकर्ता बैठक ; नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश
अहेरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी आतापासूनच जोमाने कामाला लागा, असा कानमंत्र माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या कार्यकर्त्यांना दिला. शुक्रवारी येथील वासवी सेलिब्रेशन हॉल येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते कार्यकर्त्यांमध्ये जोश भरताना बोलत होते.
या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम होते. यावेळी मंचावर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू भैय्या हकीम, कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार डॉ. आत्राम म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असतात. एकहाती सत्ता मिळवणे हे माझे ध्येय असून, उमेदवार नेतृत्ववान व कर्तृत्ववान असले आणि परिस्थितीने गरीब जरी असले, तरी त्याला निवडून आणण्यासाठी आर्थिक व अन्य मदत व पाठबळ देण्यासाठी कितीही पैसा लागो, मी तत्पर असल्याचे त्यांनी नमूद केले. हे ऐकताच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
याचवेळी सामाजिक कार्यकर्ते जावेद अली यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘घडी’ चिन्ह असलेला दुपट्टा गळ्यात टाकून त्यांचे जंगी स्वागत केले. या बैठकीतील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, हॉलच्या प्रवेशद्वाराजवळ सुरेंद्र अलोणे यांच्या संकल्पनेतून आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे हुबेहूब फोटो रांगोळीने रेखाटण्यात आले होते, जे आढावा बैठकीचे विशेष आकर्षण ठरले होते.
यावेळी प्रामुख्याने बबलू भैय्या हकीम, रियाज शेख आणि सुरेंद्र अलोणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आढावा बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नागेश मडावी यांनी केले, तर सूत्रसंचालन रतन दुर्गे यांनी केले. यावेळी अहेरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्लेन क्रॅशमधील मृतांना श्रद्धांजली: आढावा बैठकीच्या प्रारंभी, गुरुवारी दुपारी गुजरात येथील अहमदाबादवरून इंग्लंडच्या लंडन दिशेने उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या २४१ प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचाही समावेश होता. या मृत हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन धारण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.



