भंडाराविदर्भ

तरुणांना ड्रोन पायलट बनण्याची सुवर्णसंधी; ‘अमृत’ संस्थेकडून मोफत प्रशिक्षण योजना

आर्थिक दुर्बळ खुल्या प्रवर्गातील युवक-युवतींना लाभ; DGCA मान्यताप्राप्त परवाना मिळवण्याची संधी

भंडारा : महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील विद्यार्थी आणि युवक-युवतींना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (‘अमृत’ – Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) या स्वायत्त संस्थेद्वारे महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ‘विविध क्षेत्रात ड्रोन वापरण्याचे मोफत प्रशिक्षण’ दिले जाणार असून, यातून तरुणांना रोजगाराची नवी दिशा मिळणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना १० दिवसांचे डीजीसीए (DGCA) मान्यताप्राप्त प्रशिक्षण दिले जाईल. यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत दूरसंवेदन (ड्रोन) पायलट परवाना (Remote Pilot License) मिळणार आहे. या परवान्यामुळे कृषी, सर्वेक्षण, बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन, छायाचित्रण आणि चित्रफीत निर्मिती अशा विविध क्षेत्रांत नोकरी आणि स्वयंरोजगाराचे दरवाजे खुले होतील. एकूण आठ प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, ज्यात मध्यम व लघु वर्गातील ड्रोन प्रशिक्षण, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, कृषी व आपत्ती व्यवस्थापनात ड्रोनचा वापर, नकाशांकन व सर्वेक्षण, ड्रोन देखभाल-दुरुस्ती आणि छायाचित्रण व चलचित्र निर्मिती यांचा समावेश आहे. हे प्रशिक्षण पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, रायगड, कोल्हापूर आणि परभणी येथील केंद्रांवर आयोजित केले जाणार आहे.

पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

खुल्या प्रवर्गातील ज्या समाजांना इतर कोणत्याही शासकीय महामंडळाकडून योजनांचा लाभ मिळत नाही, ते या योजनेसाठी पात्र आहेत. यामध्ये ब्राह्मण, बनिया, कोमटी, सिंधी, मारवाडी, गुजराथी, पटेल, पाटीदार, राजपूत, राजपुरोहित, कायस्थ, नायर, नायडू, बंगाली, ठाकूर, त्यागी, जाट, कम्मा, कानबी, ऐयांगर, बेलमार, सेनगुनयर या जातीतील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवती, विद्यार्थ्यांना मिळणार लाभ. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, वय १८ ते ४५ वर्षांदरम्यान असावे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि तो किमान दहावी उत्तीर्ण असावा.

इच्छुक उमेदवारांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी अमृत संस्थेचे भंडारा जिल्हा व्यवस्थापक श्री. ओमकार हरदास यांना ९११२२२८७७५, ८८५७९३४७३२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. अर्जाची छापील प्रत आणि आवश्यक कागदपत्रे (उत्पन्नाचा दाखला, फिटनेस प्रमाणपत्र इ.) भंडारा येथील अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयात (स्वीट होम, शास्त्रीनगर, स्टेशन रोड) सादर करावी लागतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button