शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी ‘शहीद सैनिक आश्रित कुटुंब आरोग्य कल्याण योजनेचे’ नोंदणी व वैद्यकीय तपासणी शिबिर

70 कुटुंबांची नोंदणी ; 72 कुटुंबीयांची मोफत वैद्यकीय तपासणी
गडचिरोली : माओवाददृष्ट्या अति-संवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत माओवादी हिंसाचारात सुरक्षा दलाचे 213 जवान शहीद झाले आहेत. या शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी गडचिरोली पोलीस दल विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 5 जुलै रोजी पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे ‘शहीद सैनिक आश्रित कुटुंब आरोग्य कल्याण योजने’च्या नोंदणी व मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात 70 शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांची नोंदणी करण्यात आली, तसेच 72 कुटुंबीयांची मोफत वैद्यकीय तपासणी पोलीस रुग्णालय, गडचिरोली व सहयोग हॉस्पिटल, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. या योजनेअंतर्गत शहीद जवानांच्या आई-वडील, पत्नी व 18 वर्षाखालील पाल्यांना आपत्कालीन सेवा, ओपीडी, आयपीडी, शस्त्रक्रिया व रुग्णालयातील सर्व वैद्यकीय सुविधा पूर्णपणे मोफत मिळणार आहेत.

शिबिरात सहभागी सर्व कुटुंबीयांना योजनेची नोंदणी प्रमाणपत्रे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. योजनेमुळे कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, पॅथॉलॉजी, रेडिओलॉजीसह आधुनिक वैद्यकीय सेवा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सहज उपलब्ध होतील. या उपक्रमामुळे त्यांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण होऊन जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, भविष्यातही अशा विविध उपक्रमांची आखणी केली जाणार असून, इतर रुग्णालयांसोबत सामंजस्य करार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस रुग्णालय, गडचिरोलीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल मडावी व त्यांची टीम, सहयोग हॉस्पिटल, गोंदियाचे सहाय्यक व्यवस्थापक (हेल्थ अँड वेलनेस) डॉ. विश्वेश्वर विरुळकर व त्यांची संपूर्ण टीम जनसंपर्क शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस कल्याण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.



