
गडचिरोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या २१ ऑगस्टपासून विदर्भाच्या दौऱ्यावर येत असून, २२ ऑगस्टला ते गडचिरोली येथे बैठक घेणार आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे हे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्ष विस्तार आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतील. शिवाय विविध क्षेत्रांतील नागरिकांशी चर्चा करुन जिल्ह्यातील प्रश्नही जाणून घेणार आहेत.
राज ठाकरे हे २९ ऑगस्टला गौदिया आणि भंडारा, २२ ऑगस्टला गडचिरोली आणि चंदपूर, २३ तारखेला वणी (यवतमाळ) आणि वर्धा, २४ ऑगस्टला नागपूर आणि अमरावती, २५ ऑगस्टला वाशिम आणि अकोला, तर २६ तारखेला शेगाव येथे बुलढाणा जिल्ह्यातील पक्ष निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. याच दिवशी रात्री ते विदर्भ एक्सप्रेसने मुंबईला रवाना होणार आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे हे नागपूर येथे पत्रकार परिषदही घेणार आहेत.
जुलै महिन्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या दोन स्वतंत्र चमू विदर्भाच्या दौऱ्यावर येऊन गेल्या. या चमूतील पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना न भेटता संबंधित जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि अन्य गैरराजकीय मंडळींशी चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील मनसेचे प्रमुख पदाधिकारी पक्ष मजबुतीकरणाबाबत किती सक्रीय आहेत, ते जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवितात काय, सामाजिक उपक्रम राबवितात काय इत्यादी माहिती जाणून घेतली. शिवाय जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना भेडसावणारे प्रश्न, प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा इतिहास, सध्याची राजकीय परिस्थिती, लोकसभा निवडणुकीतील जय-पराजयाची कारणे अशा अनेक बाबींवर विस्तृत माहिती जाणून घेतली. यावेळी बहुतांश जिल्ह्यांमधून मनसेला विदर्भात मोठी संधी असल्याचा निष्कर्ष पुढे आला.
शिवसेना फुटल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांशी फारसा संपर्क नाही आणि शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना भाजपचे लोक फारसे महत्व देत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. शिवाय विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणांमध्ये भाजप आणि महायुतीची पिछेहाट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेला अनुकूल वातावरण असून, नव्याने उभारी घेण्याची चांगली संधी आहे, असे दौऱ्यावर आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या चमूच्या लक्षात आले. या चमूने राज ठाकरे यांच्याकडे तसा अहवाल पाठविल्यानंतर त्यांनी लगेच राज्यातील २५० जागा लढविण्याची घोषणा केली. त्यानंतर ठाकरे यांनी आपल्या विदर्भ दौऱ्याचे नियोजन केले आहे.



