क्रीडामहाराष्ट्रमुंबई

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची ‘हॅट्ट्रिक’

मुख्यमंत्री फडणवीसांकडून खेळाडूंचे कौतुक

मुंबई : “भले शाब्बास! जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या क्रीडा गौरवात आणखी भर घातली आहे. या यशामुळे आपण सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान आहात,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाची ‘हॅट्ट्रिक’ साधणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करत ५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदकांची लयलूट केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच, या ७ व्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने तब्बल ९ स्पर्धा विक्रमांची नोंद करणे अभिमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“ग्रामीण भागातून येणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘खेलो इंडिया स्पर्धा’ २०१८ पासून सुरू झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राने पाचव्यांदा विजेतेपद पटकावणे, हे आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणवत्तेचे द्योतक आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या कुटुंबीयांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या. तसेच, या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button