क्राईमगडचिरोलीविदर्भ

पकानभट्टीत ८ घरांवर धाड ; २२ हजारांचा मोहफुलाचा सडवा नष्ट

कोरची : शहरातील वॉर्ड क्र. १ (पकानभट्टी) येथे पोलीस प्रशासन आणि मुक्तीपथ अभियानाने संयुक्तपणे धडक मोहीम राबवित अवैध दारूविक्रेत्यांच्या अड्ड्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत ८ संशयित घरांची तपासणी करण्यात आली असून, ५ जणांकडे सापडलेला २२ हजार रुपये किमतीचा मोहफुलाचा सडवा, दारू गाळण्याचे साहित्य आणि गावठी दारूचा साठा घटनास्थळावरच नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

पकाणभट्टी वॉर्डात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारूविक्री जोरात सुरू होती. यामुळे येथे मद्यपींची सतत वर्दळ असायची, ज्याचा मोठा नाहक त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत होता. ही अवैध विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि मुक्तीपथ सातत्याने प्रयत्न करत होते, परंतु काही विक्रेते छुप्या मार्गाने हा काळा व्यवसाय सुरू ठेवत होते. ही गंभीर दखल घेत, पोलीस आणि मुक्तीपथच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकला. या कारवाईत ५ विक्रेत्यांकडे बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेला गावठी दारू,  मोहफुलाचा सडवा आणि दारू गाळण्याचे इतर साहित्य असा अंदाजे २२ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पथकाने हा संपूर्ण मुद्देमाल घटनास्थळावर नष्ट केला.

कारवाईदरम्यान पथकाने सर्व अवैध दारूविक्रेत्यांना कडक शब्दांत ताकीद दिली आहे. “यापुढे जर पुन्हा वॉर्डात किंवा शहराच्या कोणत्याही भागात अवैध दारूविक्री करताना कुणी आढळून आले, तर कोणत्याही प्रकारची गय न करता थेट गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा देण्यात आला आहे.

ही धडक कारवाई कोरची पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक देशमुख आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली. तसेच या मोहिमेत मुक्तीपथचे तालुका संघटक धर्मेंद्र बोपचे, प्रेरक अरुणा गोंनाडे आणि स्पार्क कार्यकर्ता कुसराम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या संयुक्त कारवाईमुळे शहरातील अवैध दारूविक्रीला काही प्रमाणात नक्कीच चाप बसणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button