
मुलचेरा : तालुक्यातील रेंगेवाही गावातील शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत गावात १००% दारूविक्रीबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बेकायदेशीर दारूविक्रीमुळे गावातील तरुण पिढी उद्ध्वस्त होत असल्याने आणि सामाजिक स्थैर्य धोक्यात आल्याने गावकऱ्यांनी हा आक्रमक पाऊल उचलले आहे. तसेच नियमाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडून थेट ५० हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. या धास्तीने मागील दोन महिन्यांपासून पूर्णपणे अवैध दारूविक्री बंद आहे.
रेंगेवाही गावात पूर्वी तब्बल १५ बेकायदेशीर दारू विक्रेते सक्रिय होते. यामुळे गावात दारूविक्री वाढली होती, परिणामी तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी गेला होता आणि गावातील शांतता व सुव्यवस्थेला गालबोट लागले होते. या समस्येचे उच्चाटन करण्यासाठी गावात ‘मुक्तीपथ’च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले. मुक्तीपथ तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी समितीच्या बैठका घेणे, तरुणांची संघटना व मुक्तीपथ मॅरेथॉन स्पर्धा, व्यसनमुक्ती उपचार शिबिरे आयोजित करणे यांसारख्या उपक्रमांतून अवैध दारूविक्रीविरोधात ग्रामस्थांना जागृत व एक केले. या प्रयत्नांमुळे मागील दोन वर्षांपूर्वी गावातील दारूविक्री पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
मात्र, काही दारू विक्रेत्यांनी पुन्हा जाणीवपूर्वक आणि मुजोरीने दारूविक्री सुरू केली. यामुळे गावात पुन्हा भांडण-तंटे वाढले आणि कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होऊ लागले. या वाढत्या त्रासाला कंटाळून गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि तरुणांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला. गावातील महिला, पुरुष आणि तरुण वर्गाची एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनुमते गावात कडक दारूविक्रीबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि कडक नियम ठरवण्यात आले. गावात कोणत्याही व्यक्तीने दारूविक्री केल्यास त्याला ५०,००० रुपये दंड ठोठावला जाईल. गावात कुठेही बेकायदेशीर दारूविक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती देणाऱ्या व्यक्तीस १०,००० रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल. या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण गावात गावकऱ्यांनी रॅली काढली आणि दारू विक्रेत्यांना थेट इशारा दिला. या सामूहिक प्रयत्नांमुळे सद्यस्थितीत गावात दारूविक्री पूर्णपणे बंद आहे.
गावातून अवैध दारू हद्दपार करण्यासाठी सरपंच अरुण कडते, पोलिस पाटील नंदाबाई उरेते, साईनाथ उरेते, पेसा अध्यक्ष संजय उरेते, विश्वनाथ नैताम, महेंद्र आत्राम, भैयाजी नैताम, रमेश नैताम, ग्रामपंचायत सदस्य सरिता कुलमेथे, प्रेमीला कडते, रेखाबाई कडते, सुनंदा नैताम, वंदना झोरे, अरुणा आत्राम, अंगणवाडी सेविका जयमाला आत्राम यांच्यासह गावातील युवक व महिलांनी प्रयत्न केले.



