क्राईमगडचिरोलीविदर्भ

चातगाव परिसरात अवैध मुरुम वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

तहसीलदार गणेश माळी यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाची धडक कारवाई; वाहन मालकावर कठोर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू

धानोरा : तालुक्यातील चातगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने मध्यरात्रीच्या सुमारास धडक कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून महसूल विभागाच्या पथकाने अवैध मुरुमाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर रंगेहात पकडून जप्त केले. महसूल प्रशासनाच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे तालुक्यातील भूमाफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, धानोरा तालुक्यातील चातगाव आणि परिसरातून काही घटकांकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे मुरुमाचे उत्खनन करून त्याची छुप्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत धानोराचे तहसीलदार गणेश माळी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने कारवाईचे नियोजन केले. त्यानुसार, महसूल कर्मचाऱ्यांनी चातगाव परिसरात मध्यरात्री दबा धरून संशयास्पद वाहनांवर पाळत ठेवली. यावेळी मुरुमाने पूर्णपणे भरलेले एक ट्रॅक्टर येत असताना दिसताच पथकाने ते थांबवून जप्त केले. जप्त केलेले हे वाहन पुढील कायदेशीर व दंडात्मक कारवाईसाठी धानोरा तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

महसूल विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर हे चातगाव येथील स्थानिक रहिवासी सुरेश किसन शेणमारे यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. शासकीय महसूल पूर्णपणे बुडवून आणि कोणत्याही वैध परवान्याशिवाय नैसर्गिक संपत्तीची सर्रास चोरी केल्याप्रकरणी संबंधित वाहन मालकाविरुद्ध गौण खनिज कायद्यान्वये कठोर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे.

तहसीलदार गणेश माळी यांच्या मुख्य नेतृत्वाखाली पार पडलेल्या या यशस्वी मोहिमेत नायब तहसीलदार अल्पेश वसंत बारापात्रे, ग्राम महसूल अधिकारी अक्षय शेडमाके, दिनेश पदा, उत्तम गावडे आणि प्रसाद मडावी यांनी सक्रिय सहभाग घेऊन कामगिरी फत्ते केली. तालुक्यात यापुढेही अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा महसूल विभागाने दिला असून, प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे परिसरातील अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

“तालुक्यात शासकीय महसूल बुडवून नैसर्गिक साधनसंपत्तीचे अवैध उत्खनन अथवा वाहतूक करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. दिवसा असो वा रात्री, अशा भूमाफियांविरोधात यापुढेही अधिक तीव्र आणि कठोर कारवाई सुरु राहील.”

– गणेश माळी, तहसीलदार, धानोरा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button