
गोंडवाना विद्यापीठात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात; ‘फुले दांपत्याची सामाजिक क्रांती‘ या विषयावर व्याख्यान
गडचिरोली : “सावित्रीबाई फुले यांचे कार्य केवळ शाळा सुरू करण्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते समाजाची मानसिकता बदलण्याचे क्रांतिकारी पाऊल होते. आजच्या स्त्री-शिक्षणाचा जो वटवृक्ष आपण पाहतो, त्याचा पाया सावित्रीबाईंचा त्याग आणि संघर्ष आहे. त्यामुळे फुले दांपत्याचे विचार केवळ भाषणात न ठेवता प्रत्यक्ष आचरणात आणणे हेच त्यांच्या कार्याला खरे अभिवादन ठरेल,” असे प्रतिपादन श्री. गोविंद प्रभू कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या डॉ. माधुरी कोकोडे यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘फुले दांपत्याची सामाजिक क्रांती आणि आजचे वास्तव’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे होते, तर कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, क्रीडा संचालक डॉ. अनिता लोखंडे आणि विद्यार्थी विकास संचालक डॉ. प्रिया गेडाम यांची विशेष उपस्थिती होती.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, “सावित्रीबाईंनी शिक्षणाचे शस्त्र दिले आहे, त्याचा वापर करून आपला गाव आणि देशाचा विकास व्हायला हवा. हे अध्यासन केंद्र सावित्रीबाईंनी प्रज्वलित केलेली शिक्षणाची ज्योत अधिक तेवत ठेवण्याचे काम करेल.” कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण म्हणाले, “आजच्या पिढीने सावित्रीबाईंच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साधावा. त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टांमुळेच आज आपण सुशिक्षित आहोत, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.”
यावेळी अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित ‘विद्यापीठ स्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील’ यशस्वी विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विभांगी मारोती ताजने (विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती), प्रतिभा मडावी (एस. चंद्रा महिला महाविद्यालय, आष्टी), कु. खुशबू मुकेश डोंगरवार (श्री. गोविंदप्रभू महाविद्यालय, तळोधी), अष्टमी तिरुपती मुंडे (महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर) या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारताना विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ. रजनी वाढई यांनी केले, तर उपस्थितांचे आभार समिती सदस्य डॉ. संदेश सोनूले यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या या व्याख्यानाने उपस्थित तरुणाईला सामाजिक क्रांतीची नवी दिशा दिली.



