गडचिरोलीमहाराष्ट्रमुख्य बातमीमुंबईविदर्भ

गडचिरोली जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्यासाठी टीसीआय फाउंडेशनची विशेष मोहीम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘ग्लोबल फंड’चा प्रकल्प ; ‘IMEP-3’ द्वारे व्यापक उपाययोजना

गडचिरोली/मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाचा समूळ नाश करण्यासाठी ‘ग्लोबल फंड’ने टीसीआय फाउंडेशनच्या माध्यमातून एक व्यापक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत ‘इंटेन्सिफाईड मलेरिया इलिमिनेशन प्रोग्रॅम (IMEP-3)’ हा प्रकल्प राबवला जाणार आहे, ज्यामुळे गडचिरोली जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे.

या प्रकल्पांतर्गत मलेरिया नियंत्रणासाठी विशेष भर दिला जाणार आहे. यामध्ये रोगनियंत्रणासाठी सातत्याने देखरेख, तपासणी आणि उपचारांच्या सुविधा उपलब्ध करून देणे, समाजात मलेरियाबद्दल जागरूकता वाढवणे, तसेच डास नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती या कार्यक्रमाची अंमलबजावणी करेल.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२६ पर्यंत भारत मलेरियामुक्त करण्याचे जे ध्येय ठेवले आहे, ते साध्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘ग्लोबल फंड’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी टीसीआय फाउंडेशनची ‘प्रमुख प्राप्तकर्ता’ म्हणून निवड केली आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयासोबत मलेरिया निर्मूलन उपक्रमांसाठी तांत्रिक भागीदार म्हणून काम करत आहे. या सहकार्यामुळे गडचोलीसारख्या जिल्ह्यांना मलेरियाच्या विळख्यातून बाहेर काढण्यास मदत मिळेल. या विशेष मोहिमेमुळे गडचिरोलीतील नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन जगता येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button