
लाखनी : तालुक्यातील वाकल येथील मोठ्या तलावाचा सांडवा (वेस्टवेअर) गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे फुटल्याने तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या तलावावर अवलंबून असलेल्या मत्स्यव्यवसायिकांच्या रोजगाराचा आणि परिसरातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी सांडव्याची दुरुस्ती न झाल्यास तलाव कोरडा पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
वाकल येथील हा तलाव मत्स्यव्यवसायिकांसाठी वर्षभर रोजगाराचा प्रमुख आधार आहे. अनेक वर्षांपासून येथील शेकडो ढिवर बांधव याच तलावातील मत्स्य उत्पादनावर आपले जीवन चालवत आहेत. पावसाळ्यात साठलेल्या पाण्यामुळे मत्स्यनिर्मितीला संधी मिळते, ज्यामुळे या भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होतो.
जय जवान मत्स्य सहकारी संस्था वाकल/टोला या संस्थेने सांडव्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या वर्षापासून प्रशासनाकडे वारंवार मागणी केली आहे. मात्र, शासनाच्या दिरंगाईच्या धोरणामुळे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संस्थेने केला आहे. पाटबंधारे विभागाने त्वरित लक्ष न दिल्यास या भागातील समाजबांधवांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.
लाखनी तालुक्यातील जय जवान मत्स्यपालन सहकारी संस्थेने लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने या समस्येची दखल घेऊन सांडवा दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास मत्स्यव्यवसायिकांचे मोठे नुकसान होईल, असे संस्थेने म्हटले आहे.



