क्राईमचंद्रपूरविदर्भ

हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड; आंतरराज्यीय क्रिकेट बुकीसह १३ जणांना अटक

१.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई  

चंद्रपूर : शहरालगत असलेल्या साखरवाही येथील एका फार्म हाऊसवर सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) गुरुवारी मोठी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी १३ जणांना अटक केली असून, यात गोव्यापासून आंतरराज्यीय स्तरावर क्रिकेट सट्ट्याचे जाळे विणणाऱ्या एका मोठ्या बुकीचाही समावेश आहे. या धाडीत पोलिसांनी १ लाख ७३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.

१८ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्तीवर असताना, साखरवाही येथील गुरुबाजसिंग गोतरा यांच्या फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून फार्म हाऊसवर छापा टाकला. यावेळी फार्म हाऊसच्या परिसरात असलेल्या एका झाडाखाली ‘५२ तास’ पत्त्यावर पैशांची मोठी बाजी लावली जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी १३ आरोपींना जुगाराच्या डावावरून जागीच ताब्यात घेतले.

या कारवाईचे सर्वात मोठे यश म्हणजे प्रदीप दिनकर गंगमवार (५०) याला झालेली अटक. प्रदीप हा केवळ स्थानिक नव्हे, तर क्रिकेट सट्ट्यातील जिल्ह्यातील सर्वात मोठा बुकी मानला जातो. त्याचे नेटवर्क गोव्यापासून थेट आंतरराज्यीय स्तरापर्यंत पसरलेले आहे. यापूर्वीही त्याच्यावर क्रिकेट सट्टा चालविणे आणि मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या अटकेमुळे सट्टेबाजांच्या विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रदीप दिनकर गंगमवार (५०), जीवन जगदीश सोनी (५३) रा. मुंबई, गुरुबाजसिंग रंजितसिंग गोतरा (५८), प्रदीप दिनकर गंगमवार (५०), बबलू शेख (३०), पाशा ताजमेहर शेख (४०), सुमीत निखाडे (२६), सुनील हांडे (४०), रंजित कांबळे (४३), राजू गोवर्धन (५२), संजय विठ्ठलराव गावंडे (५५), जीवन हांडे (४६), पुरनचंद बुटन (२६), अतिश जनार्धन पाटील (४५) अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींविरुद्ध पडोली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय अमोल काचोरे, पीएसआय विनोद भुरले, सुनील गौरकार व त्यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button