
गडचिरोली : दारूविक्रीबंदी असलेल्या गावांच्या सीमावर्ती जंगल परिसराचा फायदा घेऊन सुरू असलेला अवैध दारूविक्रीचा डाव मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांच्या सतर्कतेमुळे आणि पोलीस विभागाच्या तत्परतेमुळे यशस्वीपणे हाणून पाडण्यात आला आहे. देसाईगंज तालुक्यातील अरततोंडी जवळील जंगलात केलेल्या या संयुक्त कारवाईत १८७ देशी दारूच्या बाटल्यांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
मुक्तिपथ टीमने अरततोंडी येथे गावभेट दिली असता, गाव संघटनेच्या महिलांनी सांगितले की, अरततोंडी, उसेगाव आणि फरी या तिन्ही गावांच्या मध्यभागी असलेल्या जंगलाचा गैरफायदा घेत काही विक्रेते तिथे अवैध दारूविक्री करत होते. या जंगलात जाऊन परिसरातील मद्यपी दारू पीत असल्याने गावातील दारूविक्रीबंदी धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली होती. तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याची भीती लक्षात घेऊन महिलांनी यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. महिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मुक्तिपथ टीमने तात्काळ पोलीस विभागाशी संपर्क साधून सहकार्य मागितले. पोलीस आणि मुक्तिपथच्या संयुक्त पथकाने सदर जंगल परिसरात अचानक धाड टाकून चौकशी केली. या छाप्यात दारू विक्रेत्याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून १८७ देशी दारूचे टिल्लू जप्त करण्यात आले असून, संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाईत पोलीस विभागाचे बीट अंमलदार अनिल देरकर, प्रदीप भासरकर, उसेगावच्या पोलीस पाटील उमिता जुमनाके, मुक्तिपथचे तालुका संघटक लेखाराम हुलके आणि तालुका प्रेरक हेमंत मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.



