गोंदियाविदर्भ

नक्षल दमन विरोधी सप्ताहानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर ; १२० आदिवासी बांधवांना मोफत आरोग्य सेवा

आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम; दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

गोंदिया : नक्षल दमन विरोधी सप्ताहानिमित्त २०-२६ जुलै या कालावधीत नक्षली कारवायांना न जुमानता, गरजू आणि गरीब आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधा त्यांच्या गावातच मोफत मिळाव्यात या उद्देशाने गोंदिया जिल्ह्यात आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाच्या एकत्रित सहकार्याने विविध आरोग्य तपासणी शिबिरे राबवण्यात येत आहेत. याच अनुषंगाने, २४ जुलै रोजी सशस्त्र दूरक्षेत्र कॅम्प मगरडोह आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पालांदूर/जमी यांच्या संयुक्त विद्यमाने मगरडोह येथे एक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरात १२० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र पालांदूर/जमीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरभी गिर्हेपुंजे यांनी दिली.

मगरडोह येथील या आरोग्य तपासणी शिबिरात मगरडोह कार्यक्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात रक्तदाब, मधुमेह, सिकलसेल यांसारख्या आजारांची तपासणी करण्यात आली. तसेच, विविध प्रयोगशाळा रक्त तपासण्या, हिवताप रक्त नमुने गोळा करणे, आणि आरडीके किटने रक्त तपासणी करून रुग्णांना योग्य समुपदेशन करण्यात आले.

या शिबिरादरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरभी गिर्हेपुंजे, आरोग्य सहायिका शोभा पडोळे, आरोग्य सेविका साधना डोरले, फार्मासिस्ट मोनिका बहेकार, आरोग्य सेवक सदाशिव अण्णाकडे, तसेच आशा सेविका यांनी आरोग्य सेवा दिली. उपस्थितांना डॉ. सुरभी गिर्हेपुंजे यांनी सिकलसेल आणि असंसर्गजन्य आजार जसे रक्तदाब, मधुमेह व कर्करोग याविषयी मार्गदर्शन व समुपदेशन केले.

सशस्त्र दूरक्षेत्र पोलीस ठाणे मगरडोहच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नारखेडे, खेदराज राऊत आणि त्यांचे पोलीस हवालदार यांनी हे आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाला सक्रिय सहकार्य केले. या संयुक्त उपक्रमामुळे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button