गडचिरोलीविदर्भ

कुरुड येथे विदर्भस्तरीय भजन स्पर्धा उत्साहात!

माजी आ. कृष्णा गजबे यांचे युवकांना व्यसनमुक्ती आणि संस्कारांचे आवाहन ; भजन म्हणजे नैतिकतेचा संगम

देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील कुरुड (पारधी मोहल्ला) येथील प. हं. राधेश्याम बाबा मंदिराच्या पवित्र प्रांगणात श्रीमद् भागवत सप्ताहाच्या निमित्ताने समृद्धी शेतकरी स्वयंसहाय्यता बचत गट आणि समस्त ग्रामवासी कुरुड यांच्या सौजन्याने विदर्भस्तरीय भव्य भजन स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित या स्पर्धेला परिसरातील अनेक भजन मंडळांचा मोठा प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे हे होते. त्यांनी आपल्या भाषणातून आयोजकांचे आणि कुरुड येथील ग्रामस्थांचे मनःपूर्वक कौतुक केले. ते म्हणाले, “भजन म्हणजे केवळ स्वरांची मैफल नाही, तर मूल्यांचा, नैतिकतेचा आणि भक्तीचा संगम आहे.” भजनाच्या माध्यमातून निर्माण झालेले वातावरण गावाच्या विकासासाठी आणि समाजाच्या एकजुटीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

गजबे यांनी युवकांना विशेष आवाहन करताना सांगितले की, मोबाईल, व्यसन यापासून दूर राहून भजन, क्रीडा, अभ्यास आणि समाजकार्यात स्वतःला गुंतवावे. तसेच, संत तुकाराम महाराजांचे ‘भजन करा आणि समाज घडवा’ हे तत्त्व प्रत्यक्षात उतरवून प्रत्येक घरात नामस्मरण व्हावे, जेणेकरून गावातील प्रत्येक माणूस शिक्षित, स्वच्छ, व्यसनमुक्त आणि सजग नागरिक बनेल.

स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी रवींद्र गोडेफोडे (माजी नगराध्यक्ष कुरखेडा), सुनील पारधी (भाजपा तालुका अध्यक्ष), क्षितीज उके, मनोज ढोरे, रोशन ठाकरे, मिलिंद उईके, तसेच सरपंच प्रीती मडावी, ग्रामसेवक पटले यांच्यासह अनेक स्थानिक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीमद् भागवत ग्रंथपूजन व संतांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या स्पर्धेत पुरुष व महिला अशा वेगवेगळ्या विभागांत सहभाग नोंदविण्यात आला. विजेत्यांसाठी रोख रकमेची आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली होती पुरुष विभागात अनुक्रमे प्रथम २५,००१ रुपये, द्वितीय २१,००१ रुपये, तृतीय १५,००१ रुपये, चतुर्थ ११,००१ रुपये, पाचवे ९,००१ रुपये, सहावे ७,००१ रुपये व सातवे ५,००१ रुपये अशी आकर्षक पारितोषिके देण्यात आली. महिला विभागात प्रथम १०,००१ रुपये, द्वितीय ७,००१ रुपये, तृतीय ४,००१ रुपये, चतुर्थ ११,००१ रुपये व पाचवे ३,००१ रुपये अशी बक्षिसे तर बालगटातील स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button