बस्तरमध्ये अवतरणार ‘क्रिकेटचा देव’! ; २२ एप्रिलला सचिन तेंडुलकर दंतेवाडा दौऱ्यावर; इंद्रावतीच्या काठी खेळाचा नवा जागर

मुख्यमंत्री विष्णू देव साय यांची विशेष उपस्थिती ; नक्षलग्रस्त छायेतून बाहेर पडणाऱ्या मुलांशी साधणार संवाद
रायपूर : छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशासाठी २२ एप्रिल हा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला जाणार आहे. जगातील महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हे आपल्या कुटुंबासह दंतेवाडा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. एकेकाळी नक्षलवादाच्या छायेत असलेल्या या दुर्गम भागातील मुलांच्या जीवनात खेळाच्या माध्यमातून सकारात्मकता पेरण्यासाठी सचिन तेंडुलकर छिंदनार गावाला भेट देणार आहेत.
अबुझमाड प्रदेशाच्या सीमेवर आणि इंद्रावती नदीच्या काठावर वसलेले छिंदनार गाव या ऐतिहासिक भेटीचे साक्षीदार ठरेल. ‘सचिन तेंडुलकर फाऊंडेशन’मार्फत या भागात ग्रामीण क्रीडा उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांचा आढावा घेण्यासोबतच, सचिन येथील उदयोन्मुख खेळाडूंना आणि मुलांशी संवाद साधून त्यांना यशाची प्रेरणा देणार आहेत.
दंतेवाडा जेव्हा नक्षलवादी समस्येने गंभीरपणे ग्रासलेला होता, तेव्हा तेंडुलकर फाऊंडेशनने येथे क्रीडा प्रोत्साहन मोहीम सुरू केली होती. आज जेव्हा बस्तर प्रदेश नक्षलमुक्तीच्या दिशेने वेगाने पाऊल टाकत आहे, तेव्हा सचिनची ही भेट नव्या आत्मविश्वासाचे प्रतीक मानली जात आहे. मुख्यमंत्री विष्णू देव साई हे देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार असून, राज्य सरकार आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांचे दर्शन यातून घडणार आहे.
स्थानिक प्रशासन आणि क्रीडाप्रेमींमध्ये या भेटीमुळे कमालीचा उत्साह आहे. बस्तरच्या दुर्गम भागातील मुलांसाठी ही एक स्वप्नपूर्तीची संधी आहे. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूला प्रत्यक्ष पाहणे आणि त्यांच्याकडून मार्गदर्शनाचे दोन शब्द ऐकणे, ही या पिढीसाठी मोठी प्रेरणा ठरेल.
बस्तरमधील स्थानिक रहिवाशांच्या मते, अशा सेलिब्रिटींच्या भेटींमुळे केवळ खेळालाच नव्हे, तर पर्यटनाला आणि स्थानिक कौशल्यालाही जागतिक स्तरावर ओळख मिळते. तरुणांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही भेट मैलाचा दगड ठरेल. सचिन तेंडुलकरचा हा दौरा बस्तरमधील पुढच्या पिढीला मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती साकार करण्याचे सामर्थ्य देईल, यात शंका नाही.



