गोंदियाविदर्भ

बिबट्याचा महिलेवर हल्ला ; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

तिरोडा : तालुक्यातील खडकी डोंगरगाव परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम आहे. २९ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास अंगणात शेकोटी शेकत असलेल्या महिलेवर झडप घालून जखमी केले. गावकऱ्यांनी आरडा-ओरड केल्यानंतर बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून खडकी डोंगरगाव परिसरात बिबट्याचे दररोज दर्शन होत आहे. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता बुचाटोला येथील पूरणलाल अडमे व मोहचलाल कडीनाहके यांच्या वाडीमध्ये बिबट्याने ठाण मांडले होते.

आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने पळ काढला. त्यानंतर डोंगरगाव येथे प्रभू कटरे यांच्या गोठ्यातील बकरीवर झडप घातली. बिबट्याने बुचाटोला, बोदलकसा, रुस्तमपूर, खडकी, डोंगरगाव, इंदोरा, निमगाव, खमारी, चिखली, पिंडकेपार, सुकडी-डाकराम, आलेझरी, बेरडीपार, खुर्शीपार, ठाणेगाव, बालापूर, गोविंदपूर, मंगेझरी, घोटी व कोडोबर्रा परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त लावण्याची मागणी गावकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button