आरोग्यगडचिरोलीविदर्भ

NQAS मूल्यांकनात गडचिरोलीची उल्लेखनीय कामगिरी; ११ आरोग्य संस्थांना राज्यस्तरीय मानांकन

दुर्गम भागातील आरोग्य सेवांच्या गुणवत्तेची राज्यस्तरावर दखल; आता राष्ट्रीय मानांकनाकडे वाटचाल

गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम), महाराष्ट्र शासनांतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS – National Quality Assurance Standards) राज्यस्तरीय मूल्यांकनात गडचिरोली जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्य कौटुंबिक कल्याण ब्युरो, पुणे यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार जिल्ह्यातील १ उपजिल्हा रुग्णालय, १ ग्रामीण रुग्णालय आणि ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एकूण ११ आरोग्य संस्थांना NQAS राज्यस्तरीय मानांकन प्राप्त झाले आहे. दुर्गम आणि आदिवासीबहुल भागात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना या यशामुळे महत्त्वाची पावती मिळाली आहे.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या यशाबद्दल आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “गडचिरोलीसारख्या भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक जिल्ह्यातही आरोग्य यंत्रणेने गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची क्षमता सिद्ध केली आहे. या मानांकनामुळे नागरिकांना अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल. आता राष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्यासाठीही याच समर्पणाने प्रयत्न करावेत.”

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सांगितले की, “या मानांकनामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आत्मविश्वास वाढला आहे. भविष्यात जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था NQAS प्रक्रियेत सहभागी करून त्यांच्या सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येतील. तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहोचविणे हेच आमचे ध्येय आहे.”

NQAS म्हणजे काय?

National Quality Assurance Standards (NQAS) ही भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेली सार्वजनिक आरोग्य संस्थांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करणारी राष्ट्रीय प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध वैद्यकीय सेवा, रुग्णाभिमुख सुविधा, संसर्ग नियंत्रण, स्वच्छता, व्यवस्थापन आणि रुग्ण समाधान यांसह विविध निकषांची काटेकोर तपासणी केली जाते.

आठ प्रमुख निकषांवर मूल्यांकन

NQAS अंतर्गत सेवांची उपलब्धता, रुग्णांचे हक्क, निदानात्मक सेवा, रुग्ण सहाय्य सेवा, वैद्यकीय सेवांचा दर्जा, संसर्ग नियंत्रण व स्वच्छता, गुणवत्ता व्यवस्थापन तसेच रुग्णांचे समाधान व अभिप्राय या आठ प्रमुख विभागांवर बाह्य तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष भेटीद्वारे मूल्यांकन केले जाते. कागदपत्रांची तपासणी, कर्मचाऱ्यांच्या मुलाखती आणि रुग्णांच्या अभिप्रायाच्या आधारे गुणांकन करण्यात येते. राज्य किंवा राष्ट्रीय मानांकनासाठी एकूण गुणांमध्ये तसेच प्रत्येक विभागात किमान ७० टक्के गुण मिळविणे आवश्यक असते.

मानांकन प्राप्त आरोग्य संस्था

राज्यस्तरीय मानांकन प्राप्त संस्थांमध्ये अहेरी उपजिल्हा रुग्णालय, धानोरा ग्रामीण रुग्णालय तसेच कुंघाडा (ता. चामोर्शी), घोट (ता. चामोर्शी), आरेवाडा (ता. भामरागड), भेंडाळा (ता. चामोर्शी), लखमापूर बोरी (ता. चामोर्शी), देलनवाडी (ता. आरमोरी), महागाव (ता. अहेरी), कुरुड (ता. वडसा) आणि आलापल्ली (ता. अहेरी) या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

दुर्गम भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे समर्पण

गडचिरोलीसारख्या डोंगराळ, जंगलव्याप्त आणि दुर्गम जिल्ह्यात आरोग्य सेवेचा उच्च दर्जा कायम राखणे हे मोठे आव्हान असते. मात्र वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषधनिर्माते, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका आणि इतर कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही रुग्णसेवा, संसर्ग नियंत्रण, औषध उपलब्धता, स्वच्छता आणि सेवा व्यवस्थापन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत NQAS चे कठोर निकष यशस्वीपणे पूर्ण केले.

आता राष्ट्रीय मानांकनाचे लक्ष्य

उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने हे यश संपादन केले असून, पुढील टप्प्यात सर्व ११ आरोग्य संस्था केंद्र शासनाच्या ‘सक्षम’ पोर्टलवर राष्ट्रीय मानांकनासाठी अर्ज करणार आहेत. राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाल्यास केंद्र शासनाकडून विशेष प्रोत्साहन अनुदान उपलब्ध होणार असून त्याचा उपयोग आरोग्य संस्थांमधील रुग्णाभिमुख सुविधा आणि सेवा अधिक सक्षम करण्यासाठी करण्यात येणार आहे.

NQAS गुणवत्ता कक्षाचे महत्त्वपूर्ण योगदान

या यशामध्ये जिल्हास्तरीय NQAS गुणवत्ता कक्षाचे तांत्रिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. वरिष्ठ सल्लागार (दक्षता) डॉ. अनुपम महेशगौरी, गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. शिल्पा खोब्रागडे, डॉ. दीक्षांत मेश्राम, डॉ. अपूर्वा आकरे तसेच कार्यक्रम सहाय्यक वैशाली चौधरी यांनी प्रशासकीय समन्वय, प्रशिक्षण, दस्तऐवजीकरण आणि गुणवत्ता प्रक्रियेच्या अंमलबजावणीत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना हे मानांकन प्राप्त होऊ शकले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button