भंडाराविदर्भ

भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी ; ३७ रस्ते बंद, एका कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवले

वैनगंगा नदीने ओलांडली धोका पातळी ; जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट  

भंडारा : जिल्ह्याला सध्या मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. वैनगंगा नदीने धोका पातळी ओलांडली असून, सध्या तिची पातळी २४६.०३ मीटरवर आहे, तर धोका पातळी २४५.५० मीटर आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या अहवालानुसार, सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११४.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, जी जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या सरासरीच्या १०८.०२% आहे. तुमसर तालुक्यातील सिहोरा मंडळात सर्वाधिक ३४०.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

पुजारीटोला प्रकल्पाचे ८ गेट उघडण्यात आले असून १६९.७५ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे. संजय सरोवर प्रकल्पाचे २ गेट उघडले असून २४६.०० क्युमेक्स विसर्ग सुरू आहे. धापेवाडा बॅरेज सध्या फ्री फ्लो आहे आणि ८५७९.९२ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ गेट २ मीटरने उघडले असून १२९५५.६४ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील एकूण ३७ रस्ते बंद झाले आहेत, ज्यात भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, साकोली आणि लाखांदूर तालुक्यातील रस्त्यांचा समावेश आहे. लाखनी तालुक्यात एकही रस्ता बंद नाही. तरीही, पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याने वाहतुकीचा संपर्क तुटलेला नाही. सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही गावे किंवा शहरे पाण्यामुळे तुटलेली नाहीत.

लाखांदूर तालुक्यातील चिचाळ येथील एका कुटुंबाला सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामपंचायतमध्ये हलवण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतीही मनुष्यहानी किंवा पशुहानी झाल्याची नोंद नाही. मात्र, १४४ घरांचे अंशतः आणि १७ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी पूर परिस्थितीच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत. तसेच, नुकसानीचे पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात सध्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आपले ओळखपत्र, मौल्यवान वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवावीत. पुराचे पाणी ओसरल्यावर घराची आणि परिसराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने योग्य ती खबरदारी घेण्यास सांगितले आहे. तसेच, तुटलेल्या विद्युत तारा, तीक्ष्ण वस्तू आणि घरातील विद्युत उपकरणांची तपासणी केल्याशिवाय वापर न करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button