
प्रभातफेरी, रांगोळी, चित्रकला स्पर्धांनी वाढवली ‘तंबाखू सोडा, जीवन जगवा’ संदेशाची धार
गोंदिया : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक तंबाखू विरोधी दिन, ३१ मे रोजी गोंदिया जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तृप्ती कटरे आणि जिल्हा मौखिक अधिकारी डॉ. अनिल आटे यांच्या कल्पक विचारातून ३१ मे रोजी प्रभातफेरी, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि शपथग्रहण यांसारख्या विविध कार्यक्रमांनी नागरिकांमध्ये तंबाखूविरोधी जनजागृती करण्यात आली.

जिल्हा आरोग्य प्रशासन, के.टी.एस. सामान्य रुग्णालय, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या एकत्रित सहकार्याने या तंबाखू विरोधी दिन जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन केटीएस सामान्य रुग्णालयापासून करण्यात आले होते. या रॅलीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे आणि डॉ. पवन राऊत यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.
ही प्रभातफेरी केटीएस सामान्य रुग्णालय येथून इंदिरा गांधी स्टेडियम, गांधी प्रतिमा चौक, जयस्तंभ चौक या भागातून काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हातात विविध संदेश देणारे माहिती फलक होते, ज्यामुळे समाजात जनजागृती निर्माण झाली. प्रभातफेरीद्वारे विविध संदेश देत जनजागृती करण्यात आली.
त्याच दिवशी नर्सिंग परिचर्या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, जनजागृतीपर प्रभात फेरी काढून गोंदिया शहरातील विविध भागातून फिरून चौकाचौकात समुपदेशनपर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमात जिल्हा प्रशिक्षण केंद्र प्रमुख डॉ. गुरुप्रकाश खोब्रागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय घोरमारे, डॉ. सुवर्णा हुबेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती जायस्वाल, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, डॉ. पोषण बिसेन, डॉ. स्नेहा वंजारी, डॉ. सोनम जाधव, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अनिल आटे, जिल्हा सल्लागार डॉ. ज्योती राठोड, डॉ. सुवर्णा उपाध्याय, स्वाती पाटील, डॉ. मीना वट्टी, डॉ. कांचन भोयर, मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर, दंत सहाय्यक विवेकानंद कोरे, जिल्हा आय.ई.सी. अधिकारी प्रशांत खरात यांच्यासह के.टी.एस. सामान्य रुग्णालयाचे इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



