
विदर्भातील हत्तींची स्वतंत्र ‘ओळख नोंदवही’ होणार तयार ; जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रमण मार्ग आणि संभाव्य संघर्ष क्षेत्रांचे नकाशे बनवणार
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत वाढलेला हत्तींचा वावर आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी महाराष्ट्र वन विभागाने एक अत्यंत महत्त्वाचे आणि वैज्ञानिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकारातून जिल्ह्यातील वन्यजीव व्यवस्थापन अधिक गतिमान व प्रभावी करण्यासाठी हत्तींच्या हालचालींचे शास्त्रीय पद्धतीने निरीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या अनुषंगाने हत्तींच्या वावरासंबंधी अचूक माहिती संकलित करण्यासाठी महाराष्ट्र वन विभागाने ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स’ या तज्ज्ञ संस्थेला गडचिरोली जिल्ह्यात एका वर्षासाठी विशेष संशोधन आणि निरीक्षणाची अधिकृत परवानगी प्रदान केली आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव संरक्षक, महाराष्ट्र राज्य यांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, ही संस्था पूर्णपणे वन विभागाच्या थेट समन्वयाने काम करणार आहे. गडचिरोलीतील हत्तींच्या कळपांच्या हालचालींची अचूक नोंद ठेवणे, त्यांचे दस्तावेजीकरण करणे, त्यांच्या पारंपरिक भ्रमण मार्गांचे तांत्रिक विश्लेषण करणे तसेच क्षेत्रीय स्तरावरून थेट माहिती संकलित करण्याचे मुख्य काम ही संस्था करणार आहे. हा नियमित डेटा वन विभागाला पुढील नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, विदर्भातील हत्तींची एक स्वतंत्र आणि सविस्तर ओळख नोंदवही तयार केली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक हत्तीची विशिष्ट छायाचित्रे, कळपांची अचूक रचना, त्यांचे वय-लिंग वर्गीकरण आणि त्यांच्या वर्तनविषयक विशेष नोंदींचा समावेश केला जाईल. यामुळे विशिष्ट कळप किंवा हत्तीचा स्वभाव आणि त्याची गती ओळखणे वन कर्मचाऱ्यांना सोपे जाईल.
हत्ती नेमके कुठून प्रवास करतात, हे शोधण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजेच ‘जीआयएस’ तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाईल. या माध्यमातून हत्तींच्या मुख्य भ्रमण मार्गांचे डिजिटल नकाशे तयार करणे. त्यांच्या विश्रांतीची जंगलातील मुख्य ठिकाणे शोधणे. हत्ती रेल्वे ट्रॅक किंवा रस्ते नेमके कुठून ओलांडतात, ती ठिकाणे निश्चित करणे. मानव आणि हत्ती यांच्यातील संभाव्य संघर्ष क्षेत्रे ओळखून गावनिहाय घटनांचे विश्लेषण करणे.
हत्ती गावात किंवा शेतशिवारात येण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांना त्यांची अचूक माहिती मिळावी, यासाठी विशेष माहिती प्रसार यंत्रणा राबवली जाईल. संस्था आणि वन विभागातर्फे गावस्तरीय बैठका, जनजागृती कार्यक्रम आणि शाळांसाठी हत्तींविषयी माहिती देणारे विशेष साहित्य तयार केले जाईल. तसेच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वयंसेवक आणि गावकऱ्यांसाठी हत्ती हाताळणीचे विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
दर तीन महिन्यांनी या प्रकल्पाचा तिमाही प्रगती अहवाल, तांत्रिक नकाशे आणि क्षेत्रीय अभ्यास अहवाल वन विभागाकडे सादर केला जाईल. गडचिरोलीत हत्तींचा वाढता वावर पाहता, हे वैज्ञानिक पाऊल भविष्यात शेतीचे नुकसान टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.



