गडचिरोलीविदर्भ

शिवाजी महाराजांचे चरित्र हे केवळ युद्धगाथा नसून, ते एक व्यापक समाजप्रबोधन – डॉ. सतिश चाफले

छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्यावतीने व्याख्यान व पारितोषिक वितरण कार्यक्रम

गडचिरोली : शिवाजी महाराजांचा सामाजिक दृष्टिकोन हा प्रत्येक घटकाला न्याय देणारा होता. शिवाजी महाराजांचे चरित्र हे केवळ युद्धगाथा नसून, ते एक व्यापक समाजप्रबोधन आहे, असे मत प्रा. डॉ. सतिश चाफले यांनी व्यक्त केले.

गोंडवाना विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्यावतीने आयोजित शिवाजी महाराजांचे सोशल इंजिनिअरींग या विषयावरील व्याख्यान तसेच बोधचिन्ह व निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, अधिसभा सदस्य नंदाजी सातपुते, धमेंद्र मुनघाटे, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाचे समन्वयक प्रा. विकास चित्ते, प्रा. डॉ. सुनिल बागडे, प्रा. डॉ. कृष्णा कारु उपस्थित होते.

यावेळी मान्यरांच्या हस्ते बोधचिन्ह व निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धंकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये निबंध स्पर्धेमध्ये गायत्री चौके, स्नेहल मेश्राम व तुषार दुधबावरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. बोधचिन्ह स्पर्धेमध्ये लखन देवतळे, उत्कर्ष नागपुरे व गणपती गज्जेला यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.

चाफले म्हणाले, शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्थेची उभारणी करताना  मावळ्यांची गुणग्राहकता व त्यांच्या कौशल्याची पारख करुन स्वराज्य उभारण्यासाठी त्यांच्यावर योग्य तो विश्वास दाखवून त्यांच्या मदतीने स्वराज्याचे तोरण बांधले. त्यांचे धोरण म्हणजे केवळ रणनिती नव्हे, तर समाज सुधारण्याची दूरदृष्टी होती. आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत सामाजिक एकता आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीराम कावळे यांनी आपल्या भाषणामध्ये शिवाजी महाराजांचे नेतृत्व, प्रशासन आणि दूरदृष्टी यावर सखोल विवेचन केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते एक उत्कृष्ट प्रशासक होते. त्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली आणि तिला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रभावी धोरणे राबवली. त्यांच्या राज्यकारभारातील व्यवस्थापन कौशल्य आजच्या काळातही मार्गदर्शक ठरते. युवा पिढीने शिवाजी महाराजांच्या कार्यशैलीतून प्रेरणा घ्यावी आणि समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे असे ते म्हणाले.

प्रा. विकास चित्ते यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन या कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे व कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत ठाकरे यांनी केले. आभार प्रा. अतुल गावस्कर यांनी मानले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन समितीचे सदस्य डॉ. संध्या येलेकर, सतिश पडोळे यांच्यासह प्राध्यापक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button