
एस.टी. महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सोहळा ; रमेश पानतावणे व मो. युसुफखान यांना २५ हजारांचा रोख पुरस्कार व प्रशस्तीपत्र प्रदान
भंडारा : सर्वसामान्यांची जीवनदायिनी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी सर्वांची लाडकी ‘लालपरी’ अर्थात एस.टी. महामंडळाने आपल्या गौरवशाली प्रवासाची ७८ वर्षे पूर्ण केली आहेत. या ऐतिहासिक वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सलग २५ वर्षे प्रवाशांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत, एकही अपघात न करता अविरत विना अपघात सेवा देणाऱ्या आदर्श चालकांचा सपत्नीक जाहीर सत्कार करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत रा.प. महामंडळाच्या भंडारा विभागातील दोन कर्तव्यदक्ष चालकांची या सर्वोच्च बहुमानासाठी निवड करण्यात आली. विभागीय कार्यालय, भंडारा येथील प्रशिक्षण हॉलमध्ये आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात हा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
भंडारा विभागातून या विशेष सन्मानासाठी निवड झालेल्या चालकांमध्ये रमेश तुळशिराम पानतावणे (पवनी आगार) आणि मो. युसुफखान मो. युनसखान (भंडारा आगार, सध्या सेवानिवृत्त) यांचा समावेश आहे. प्रवाशांना सुरक्षित दळणवळणाची सेवा दिल्याबद्दल या दोन्ही सत्कारमूर्ती चालकांचा त्यांच्या सुविद्य पत्नीसह मान्यवरांच्या हस्ते रोख २५ हजार रुपये, प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि साडी-खण देऊन विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून व दीपप्रज्वलन करून सोहळ्याची अधिकृत सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भंडारा विभागाचे विभागीय वाहतूक अधीक्षक (अतिरिक्त) प्रविण गोल्हर यांनी भूषविले, तर कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय वाहतूक अधिकारी शितल शिरसाट यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भंडारा जिल्ह्याच्या जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे तसेच रा.प. भंडारा विभागाचे तालुका अधिवक्ता मा. ॲड. प्रकाश निचकवडे प्रामुख्याने उपस्थित होते.
सोहळ्याला संबोधित करताना प्रमुख अतिथींनी एस.टी.च्या ७८ वर्षांच्या प्रदीर्घ आणि ऐतिहासिक प्रवासाचा आढावा घेतला. “आज खाजगी वाहनांची संख्या वाढली असली, तरीही सर्वसामान्य जनतेचा एस.टी.वरील विश्वास आजही तितकाच अढळ आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. महामंडळाच्या विविध लोकाभिमुख उपक्रमांचे कौतुक करत, या प्रकारच्या पुरस्कारांमुळे इतर कार्यरत चालकांनाही सुरक्षित आणि विना अपघात सेवा देण्याची मोठी प्रेरणा मिळेल, अशी आशा मान्यवरांनी व्यक्त केली.
याच कार्यक्रमात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करून बक्षीस पात्र ठरलेल्या बसस्थानकांचे आणि तिथल्या कर्मचाऱ्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक भारती सांगोडे यांनी केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक भूमिका विभाग नियंत्रकांचे स्वीय सहाय्यक चंद्रप्रकाश तरारे यांनी मांडली, तर शेवटी उपस्थितांचे आभार लेखाकार प्रमोद बारई यांनी मानले. या गौरव सोहळ्याला भंडारा विभागातील चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी, पर्यवेक्षक तसेच विविध आगार व्यवस्थापक आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



