गडचिरोलीविदर्भ

१ ऑगस्ट रोजी जिल्हा काँग्रेसचे ‘भीक मांगो’ आंदोलन; वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र जागा व शासकीय भरतीची मागणी

दोन पालकमंत्री असतानाही जागेची अनुपलब्धता काँग्रेसकडून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती

गडचिरोली : गडचिरोली येथे महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत अद्यापही अस्तित्वात न आल्याने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र जागा व शासकीय भरतीची मागणी करण्यासाठी येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजता इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात येणार आहे.

काँग्रेसने सरकारवर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री असताना आणि त्यांच्या सोबतीला सहपालकमंत्री आशिष जयस्वाल असे दोन पालकमंत्री जिल्ह्यात असतानाही वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी जागा उपलब्ध होत नसेल, तर हे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. ही परिस्थिती सरकारच्या अनास्थेचे प्रतीक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

याशिवाय, सदर वैद्यकीय महाविद्यालयात खाजगी कंपनीमार्फत नोकर भरती सुरू करण्यात आली असली तरी, ही प्रक्रिया आजतागायत पूर्ण झालेली नाही. यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. ही भरती शासकीय यंत्रणेमार्फत पार पाडण्यात यावी, अशी प्रमुख मागणीही काँग्रेसने केली आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले की, ‘भीक मांगो’ आंदोलनाद्वारे गोळा झालेला निधी शासनाला दिला जाईल, जेणेकरून त्या माध्यमातून तरी सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी जागा खरेदी करावी. या आंदोलनात जिल्ह्यातील युवक, विद्यार्थी, काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button