
सेंदुरवाफा टोल नाक्याजवळील घटना
साकोली: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सेंदुरवाफा टोल नाक्याजवळ रविवारी (दि. १२) रात्री उशिरा झालेल्या एका भीषण अपघातात एका ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. डिझेल भरण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. शादीक अली (वय ३५, रा. पिपरगड्डी, उत्तर प्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.
शादीक अली आणि त्याचा क्लिनर सिराज कलिममुल्ला खान (वय २०) हे सीजी ०४/एचएक्स-९३२६ क्रमांकाच्या ट्रकने प्रवास करत होते. सेंदुरवाफा टोल नाक्याजवळ त्यांनी ट्रक थांबवून डिझेल भरणे सुरू केले. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या डब्ल्यू ३३/ई-४६२४ क्रमांकाच्या ट्रकने निष्काळजीपणे वाहन चालवत उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या जबर धडकेत ट्रकचालक शादीक अली गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघातात तो मागच्या ट्रकच्या टायरखाली चिरडला गेला.
अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. साकोली पोलिसांनी फिर्यादीच्या तोंडी अहवालावरून आरोपी ट्रकचालक बरुनकुमार सरमाई सानटा (वय ४८, रा. मदनापूर, पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली साकोली पोलीस पुढील तपास करत आहेत.



