
यावर्षी तरी हे काम पूर्ण होईल का? – राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा संतप्त सवाल
चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील सर्वांत मोठे व्यापारी केंद्र आणि मोठी लोकसंख्या असलेल्या चामोर्शी शहरात गेल्या साडेसात वर्षांपासून नवीन बस स्थानकाचे काम कासवगतीने सुरू आहे. प्रशासनाचे कंत्राटदारावर नियंत्रण नसल्याने या कामाचा पुरता बोजवारा उडाला असून, यावर्षी तरी हे काम पूर्ण होईल का? असा संतप्त सवाल आता नागरिक आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने उपस्थित केला आहे.
चामोर्शी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथे यशोधरा कन्या विद्यालयाच्या बाजूला नवीन बस स्थानकाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र, साडेसात वर्षे उलटूनही हे काम पूर्णत्वास आलेले नाही. यामुळे प्रवाशांना मुख्य मार्गालगत उन्हात ताटकळत उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि बालकांचे हाल होत आहेत. बस स्थानकावर पाण्याची सोय नसल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना विकतच्या बाटल्या घेऊन तहान भागवावी लागत आहे. महिला प्रवासी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांच्या नेतृत्वात प्रशासनाला तातडीने हे काम पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “साडेसात वर्षे उलटूनही कंत्राटदाराला जाब विचारण्याचे धारिष्ट्य प्रशासन का दाखवत नाही? हा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांचा संकोच आहे. हे काम तातडीने पूर्ण करून प्रवाशांसाठी खुले करण्यात यावे.” अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी केली आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये, किशोर कुंडू, तालुकाध्यक्ष कालिदास बनसोड, तालुका सचिव दिनेश मुजुमदार, संतोष बुरांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. चामोर्शी तालुका आणि आसपासच्या ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज या ठिकाणी येतात. त्यांची गैरसोय थांबवण्यासाठी प्रशासनाने कंत्राटदारावर कठोर कारवाई करून कामाला गती द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.



