
जांभळी टोला येथे पोलीस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई
धानोरा : तालुक्यातील जांभळी टोला येथे गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ टीमने संयुक्त कारवाई करीत ३५ लिटर दारूसह मोहफुलाचा सडवा नष्ट केला. तसेच एका महिलेच्या घरातून सुगंधित तंबाखू जप्त केला. याप्रकरणी चार जणांवर गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील इतर विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
सीमावर्ती भागातील जंगलपरिसराचा गैरफायदा घेत जांभळी परिसरातील दारूविक्रेते हातभट्टी लावून बेकायदेशीरपणे दारू गाळतात . या अड्ड्यांवरून तालुका मुख्यालयासह जवळपासच्या अनेक गावांमध्ये किरकोळ दारू विक्रेत्यांना पुरवठा केला जात होता. संबंधित विक्रेत्यांवर यापूर्वीही वारंवार अहिंसक कृती आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कायदेशीर कारवाया करण्यात आल्या, तरीही त्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला होता. या दारूविक्रीमुळे परिसरातील ग्रामीण महिलांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते. अशातच, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली व धानोरा मुक्तीपथ टीम आणि पोलीस विभाग यांनी धानोरा तालुक्यातील जांभळी टोला येथे संयुक्त मोहीम राबवून मोठी कारवाई केली.
या संयुक्त कारवाई दरम्यान जांभळी टोला येथील वेगवेगळ्या घरांवर छापे टाकण्यात आले. यावेळी पोलिसांनी हातभट्टीचा मोठ्या प्रमाणावर असलेला मोह सडवा जागेवरच नष्ट केला. तसेच ३५ लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. या बेकायदेशीर दारूविक्री प्रकरणी ३ दारूविक्रेत्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. दारू सोबतच, एका घरात मिळून आलेला सुगंधित तंबाखू ही जप्त करण्यात आला असून, संबंधित महिला तंबाखू विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे.
सदर धडक कारवाई गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ठाकरे व त्यांच्या पोलीस पथकाने केली. या मोहिमेत मुक्तीपथचे तालुका संघटक राहुल महाकुलकर, रेवनाथ मेश्राम, भास्कर कड्यामी, मेघा गोवर्धन तसेच स्पार्क संस्थेच्या मयुरी चिचघरे व अनुश्री सावरकर प्रामुख्याने उपस्थित होते.



