गडचिरोलीविदर्भ

पोर्ला येथे ‘अँटी मलेरिया महिना’ उन्मुखीकरण कार्यशाळा उत्साहात ; ‘मलेरियामुक्त गाव’ संकल्पनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गडचिरोली : TCI Foundation च्या सौजन्याने तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दिशानिर्देशानुसार व जिल्हा मलेरिया अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर “मलेरियामुक्त गाव” ही संकल्पना विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोर्ला येथील शिवाजी महाविद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, पोर्ला येथे “अँटी मलेरिया महिना” निमित्त उन्मुखीकरण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

कार्यशाळेत ग्रामस्थ, विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमामध्ये मलेरिया या डासांद्वारे पसरणाऱ्या गंभीर संसर्गजन्य आजाराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मलेरियाची लक्षणे, वेळेवर रक्त तपासणीचे महत्त्व, योग्य उपचार, तसेच घर व परिसर स्वच्छ ठेवून डासांच्या उत्पत्तीस्थळांचे निर्मूलन करण्याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

यावेळी “पाणी साचू देऊ नका, डास वाढू देऊ नका”, “ताप आला तर त्वरित रक्त तपासणी करा” आणि “स्वच्छ परिसर – निरोगी जीवन” या संदेशांद्वारे प्रभावी जनजागृती करण्यात आली. तसेच आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारे ताप सर्वेक्षण, रक्त तपासणी, डास नियंत्रण उपाययोजना, घरभेटी, फवारणी व लोकसहभागातून स्वच्छता अभियान याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोर्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच निवृता राऊत या होत्या. प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य अशोक बोहरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उपलेंचवार, एन्टोमॉलॉजिस्ट डॉ. एल. जे. कान्हेकर, मुख्याध्यापक दोनाडकर, TCI Foundation चे जिल्हा समन्वयक महेश झरकर, डॉ. भक्ती चौधरी, अजय गायकवाड तसेच डंबाजी कावळे यांनी मलेरिया प्रतिबंधासाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास पोर्ला ग्रामपंचायत पदाधिकारी, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच TCI Foundation ची जिल्हास्तरीय टीम आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “मलेरियामुक्त गाव” घडविण्यासाठी स्वच्छता, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करण्याचा सामूहिक संकल्प केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button